जीवनसत्त्वे आणि हाडांचे आरोग्य

  आपल्या शरीराला उभे करण्याचे काम हाडे करीत असतात. मानवी पायामध्ये 26 हाडे असतात. मनगटासह मानवी हातामध्ये 54 हाडांचा समावेश असतो. मांडीचे हाड हे सर्वात लांब आणि मजबूत हाड असते. कानाच्या मधल्या भागात जे हाड असते ते सर्वात लहान आणि पातळ हाड असते. हाताची हाडे ही सर्वाधिक वेळा मोडणारी हाडे आहेत. हाडांविषयीची ही माहिती आणि शरीर उभारणीसाठी असणारे त्यांचे महत्त्व लक्षात घेता हाडांचे आरोग्य सांभाळणे किती आवश्यक आहे हे लक्षात येईल; परंतु आपण त्यांची काळजी न घेता त्यांना गृहित धरत असतो त्यांची काळजी घेऊन ती मजबूत राखली पाहिजेत.

  आपले वय जसजसे वाढते तसे हाडांची घनता कमी होत जाते ती ठिसूळ होऊ लागतात. घनता कमी झाल्यामुळे ऑस्टोपोरोसीस होण्याची शक्यता वाढते. आपल्या हाडांचे आरोग्य राखण्यासाठी गरजेचे कॅल्शियम आणि जीवनसत्त्वांचा पुरवठा शरीराला होणे गरजेचे आहे. मजबूत हाडांसाठी मुख्यत्वे सहा जीवनसत्त्व मिळण्याची गरज आहे.

  ‘डी’ जीवनसत्त्व
  आपल्या शरीरातील कॅल्शियम आणि फॉस्फेट यांची निर्धारित पातळी राखण्यासाठी शरीराला ‘डी’ जीवनसत्त्वाचा योग्य प्रमाणात पुरवठा होणे गरजेचे असते. ‘डी’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे हाडे ठिसूळ होतात, पण ‘डी’ जीवनसत्त्व आहे त्या परिस्थितीत शरीरात शोषले जाऊ शकत नाही. त्यामुळे ओमेगा थ्री फॅटी अ‍ॅसिड ‘डी’ जीवनसत्त्व शरीरात शोषून घेण्यासाठी गरजेचे असते. ‘डी’ जीवनसत्व कॅल्शियम शोषून घेत असते. त्यामुळे आपल्या आरोग्यदायी हाडांसाठी शरीरात कॅल्शियम शोषले जाण्यासाठी याच ‘डी’ जीवनसत्त्वाची गरज असते. त्यामुळे कॅल्शियम शोषले जाण्यासाठी आपल्या आहारातून ‘डी’ जीवनसत्त्वाचा योग्य पुरवठा शरीराला होणे गरजेचे असते.

  ‘सी’ जीवनसत्त्व
  शरीरातील उतींच्या जाळ्यात पांढऱ्या रंगाचा प्रथिन घटक असतो. त्यामुळे हाडे तयार होण्याची प्रक्रिया होत असते. शरीराला आवश्यक असणाऱ्या या प्रथिन घटकाच्या निर्मितीसाठी ‘सी’ जीवनसत्त्वाची आवश्यकता असते. नवीन कठीण हाडांच्या निर्मिती करणाऱ्या ऑस्टिओ ब्लास्ट पेशींचे काम नीट सुरू राहण्यासाठीसुद्धा ‘सी’ जीवनसत्त्वाची आवश्यकता असते.

  ‘बी 12’ जीवनसत्त्व
  हे अतिशय महत्त्वाचे जीवनसत्त्व आहे. ‘बी 12’ या जीवनसत्त्वाची कमतरता असणाऱ्या व्यक्तींना हाडांशी निगडित आजारांना तोंड द्यावे लागत असल्याचे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मजबूत हाडांसाठी ‘बी 12’ जीवनसत्त्वयुक्त असा आहार घ्या.

  ‘ए’ जीवनसत्त्व
  आपल्या पार्श्‍वभागाचे म्हणजेच माकड हाड मोडण्याची शक्यता कमी करण्याचे काम ‘ए’ जीवनसत्त्व करते. आपण जर मल्टि व्हिटामिन आणि मिनरल सप्लीमेंट म्हणजे विविध जीवनसत्त्व आणि पूरक खनिजद्रव्यांचे सेवन करत असाल तर त्यामध्ये ए व्हिटामीनचे प्रतिदिन प्रमाण 100 टक्क्यांपेक्षा अधिक नाही ना याची खात्री करूनच ते घ्या. ज्या जीवनसत्त्वाच्या पूरक औषधांमध्ये बीटा कॅरोटीनच्या रुपात 20 टक्के ‘ए’ जीवनसत्त्व किंवा कॅरोटीनचे मिश्रण असणारे जीवनसत्त्वाचा डोस घेत असाल तर फारच उत्तम. आपल्या व्हिटामिनवरील माहितीचा कागद वाचून मगच डोस सुरू करा. आपल्या पूरक आहारामध्ये एकत्रितपणे दिवसभरात 100 टक्क्यांहून अधिक ‘ए’ जीवनसत्त्वाचे प्रमाण नाही ना याकडे आवर्जून लक्ष द्या.

  ‘ई’ जीवनसत्त्व
  आपल्या हाडांचे संरक्षण करण्याचे काम ‘ई’ जीवनसत्त्व करते. निकोटिनचे सेवन करत असल्यास त्यामुळे होणारे हाडांचे नुकसान भरून निघण्यासाठी ‘ई’ जीवनसत्त्व उपयोगी ठरते. दाह होणार्‍या ऑस्टोपोरोसिस या आजारामध्ये ‘ई’ जीवनसत्त्व खूप फायदेशीर असते. स्त्रियांमध्ये मेनापॉजनंतरच्या काळात हाडांमधील खनिजांचे प्रमाण किंवा घनता कमी होते. हाडांतील खनिजांचे प्रमाण ‘ई’ जीवनसत्त्व वाढवू शकते, असे निष्कर्ष काही अभ्यासातून समोर आले आहेत.

  ‘क’ जीवनसत्त्व
  हाडांमधील खनिजांची घनता किंवा हाडांची घनता वाढवण्यासाठी ‘क’जीवनसत्त्वाचा योग्य पुरवठा होणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे हाडे तुटण्यापासूनही प्रतिबंध होतो. आपल्या रक्तातील कॅल्शियम शोषून घेऊन ते हाडांमध्ये जमा करत असल्याने नवीन हाडे तयार होण्याच्या क्रियेला ‘क’ जीवनसत्त्वाची मदत मिळते.