cleaning home

ज्‍याप्रमाणे आपण साबण व पाण्‍याने आपले हात स्‍वच्‍छ (Hand Wash)धुतो, अगदी त्‍या प्रकारेच घरदेखील स्‍वच्‍छ(Cleaning home) ठेवता येऊ शकते.

  कोरोना विषाणूचा(Corona Virus) प्रादुर्भाव वाढत असताना लोकांनी घरामध्‍ये विषाणूच्‍या प्रादुर्भावाला आळा घालण्‍यासाठी निर्जंतुकांचा वापर वाढवला आहे. लोक ब्‍लीच व सॅनिटायझर्स वापरून फळे व भाज्‍या धुवत आहेत. घराच्या स्वच्छतेसाठी अनेक गोष्टी वापरत आहेत. त्‍वचेवर घरगुती क्‍लीनिंग किंवा निर्जंतुक उत्‍पादनांचा वापर केला जात आहे. असे केल्याने नकळतपणे त्‍यांच्‍या शरीरामध्‍ये निर्जंतुकांनी प्रवेश केला आहे. पण, या उत्‍पादनांमध्‍ये रसायने असतात, जी विशेषत: योग्‍य प्रकारे न वापरल्यास तुमच्‍या आरोग्‍यासाठी घातक ठरू शकतात. डॉ. सुधीर गोरे यांनी निर्जंतुकीकरणाविषयी मार्गदर्शन(Sanitization) केले आहे.

  सर्वात महत्त्वाचे म्‍हणजे साबण/डिटर्जंट व पाण्‍याने हात स्‍वच्‍छ धुण्‍याची प्राचीन पद्धत कोविड-१९ विरोधात गुणकारी आहे. सतत मिळत असलेल्‍या पुराव्‍यांमधून निदर्शनास येते की, नियमितपणे स्‍वच्‍छतेसाठी साबण व पाण्‍याचा वापर या विषाणू दूर करण्‍यासाठी आणि संसर्गांपासून प्रतिबंधासाठी पुरेसा आहे. ज्‍याप्रमाणे आपण साबण व पाण्‍याने आपले हात स्‍वच्‍छ धुतो, अगदी त्‍या प्रकारेच घरदेखील स्‍वच्‍छ ठेवता येऊ शकते.

  निर्जंतुकांमध्‍ये घातक रसायने असतात

  क्‍लीनिंग व निर्जंतुक उत्‍पादने सूचनांनुसार वापरणे गरजेचे आहे. काही निर्जंतुकांमध्‍ये अमोनियम संयुगे असतात, ज्‍यामुळे दमा होऊ शकतो. ज्‍यामुळे, सावधगिरी बाळगणे आवश्‍यक आहे, विशेषत: घरामध्‍ये लहान मुलं व वृद्ध व्‍यक्‍ती असतील तर विशेष काळजी घेण्याची गरज आहे. ब्‍लीचिंगमुळे श्‍वसन, त्‍वचा व डोळ्यांना संसर्ग होऊ शकतो. लोकांनी हायड्रोजन पेरॉक्‍साईड, अल्‍कोहोल (इसोप्रोपिल अल्‍कोहोल किंवा इथेनॉल), सायट्रिक ॲसिड व लॅक्टिक ॲसिड असलेल्‍या निर्जंतुकांचा वापर करावा. पण खाद्यपदार्थ, कपडे, भांडी आणि  मोकळ्या हातांवर त्‍यांचा वापर करू नये.

  कोरोना विषाणू पृष्‍ठभागापेक्षा संपर्कातून अधिक पसरतो

  अनेक तज्ञांनी वेळोवेळी निदर्शनास आणले आहे की, विषाणू मुख्‍यत्‍वे व्‍यक्‍ती-ते-व्‍यक्‍ती संपर्कातून पसरतो. प्रभावी क्‍लीनिंग पृष्‍ठभागांवरून जीवाणूंना दूर करते आणि निर्जंतुकीकरण त्‍याच ठिकाणी त्‍यांना नष्‍ट करते. पण पृष्‍ठभाग सतत स्‍वच्‍छ करण्‍याबाबत धास्ती घेण्‍याची गरज नाही. नुकतेच सेंटर फॉर डिसीज कंट्रोल ॲण्‍ड प्रीव्‍हेंशन, युएस अहवालामधून निदर्शनास आले की यूव्‍ही रेडिएशन, एलईडी ब्‍ल्‍यू लाइट्स किंवा टनेल्‍सचे सॅनिटायझेशन यांसारख्‍या पर्यायी निर्जंतुकीकरण पद्धती विषाणू नष्‍ट करण्‍यासाठी उपयुक्‍त ठरतात याबाबत कोणताच उत्तम पुरावा नाही. हवा खेळती नसल्‍यास निर्जंतुकाच्या उपयुक्‍ततेपेक्षा तुमच्‍या आरोग्‍यावर अधिक घातक परिणाम होऊ शकतो.

  सीडीसीचा अहवाल निदर्शनास आणतो की, औद्योगिक क्षेत्रांच्‍या स्‍वच्‍छतेसाठी फॉगिंग, धूराचा मारा आणि इतर अशाप्रकारची कार्ये मानवी आरोग्‍याच्‍या संदर्भात उपयुक्‍त ठरण्‍यापेक्षा घातक ठरू शकतात. यामागील कारण म्‍हणजे जागेमधून विषाणू पूर्णपणे नष्‍ट करण्‍यासाठी केल्‍या जाणाऱ्या फॉगिंगमुळे लोकांना श्‍वास घेण्‍यास त्रास होऊ शकतो.

  योग्‍य स्वच्छता आणि संरक्षणाच्या ३ सोप्या पद्धती

  •  पृष्‍ठभागांच्‍या योग्‍यप्रकारे स्‍वच्‍छतेसाठी साबणाचे पाणी वापरा.तुम्‍ही निर्जंतुकाचा वापर करत असाल तर उत्‍पादनासंदर्भातील सर्व सूचना वाचा. या सूचनांमुळे तुम्‍हाला निर्जंतुक रसायन कशाप्रकारे काम करते आणि त्‍याचा कशाप्रकारे वापर करावा हे समजेल.
  • स्‍वच्‍छतेसाठी घातक रसायनांचा वापर करत असाल तर मास्‍क व प्रोटेक्टिव्‍ह आय गिअर परिधान करा. हवा खेळती राहण्‍यासाठी स्‍वच्‍छ करत असलेली खोली उघडी ठेवा. मुले व वृद्धांनी क्‍लीनिंग केल्‍यानंतर किमान ४ दिवस या खोलीमध्‍ये प्रवेश करू नये.
  • खोल्‍यांची साफसफाई करताना हवा खेळती राहण्‍यासाठी खिडक्‍या व दरवाजे उघडे ठेवा.

  सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सार्वजनिक ठिकाणी मास्‍क घालणे आणि जवळच्‍या संपर्कामधून कोविड-१९चा व्‍यक्‍ती-ते-व्‍यक्‍ती होणारा प्रसार टाळणे महत्त्वाचे आहे. घरी राहा, स्‍वच्‍छ राहा आणि सुरक्षित राहा!