heart

लॉकडाऊन(lockdown) असताना तसेच लॉकडाऊन संपल्यानंतर सर्वात जास्त मानसिक ताणतणावाला(mental stress to woman) शहरातील महिला सामोऱ्या जात आहेत. अनेक घरातील कर्त्या पुरुषांची नोकरी व व्यवसाय गेल्यामुळे घर चालविताना अनेक महिलांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

हृदयविकाराचं(heart problems) प्रमाण हे महिलांपेक्षा पुरूषांमध्ये अधिक आढळतं, असा एक समज आहे. मात्र महिलांच्या मृत्यूसाठी सर्वाधिक कारणीभूत ठरणारे कारण हे ‘हृदयविकार’ आहे, हे अनेक जणांना माहीत नाही.

देशात कोरोना विषाणू हात पाय पसरायला लागला आणि दुसरीकडे आपले जीवनच बदलून गेले. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. मात्र यामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर याचा वेगळा परिमाण झाल्याचे दिसून आले आहे. मार्चपासून सुरु झालेल्या लॉकडाऊनमुळे शहरातील नागरिकांचे जीवन एका फ्लॅटमध्ये बंदिस्त झाले होते सलग सहा महिने घराबाहेर न पडल्यामुळे अनेकांना वाढलेल्या वजनाचा सामना करावा लागत असून यात महिलांचे प्रमाण जास्त आहे.

मुलांना शाळेत पोहचवायला जाणे, बाजारातून सामान आणणे तसेच जिम व योग वर्ग यावर बंधने आली तसेच नोकरदार महिलांचा प्रवास पूर्णपणे थांबल्यामुळे तसेच अनेक महिलांची नोकरी गेल्यामुळे त्यांच्या मानसिक ताणतणावात भर पडली. याचा परिणाम त्यांच्या तब्येतीवर झाला आहे.

याविषयी अधिक माहिती देताना हृदयशल्यविशारद डॉ. संजय तारळेकर म्हणाले, लॉकडाऊन असताना तसेच लॉकडाऊन संपल्यानंतर सर्वात जास्त मानसिक ताणतणावाला शहरातील महिला सामोऱ्या जात आहेत. अनेक घरातील कर्त्या पुरुषांची नोकरी व व्यवसाय गेल्यामुळे घर चालविताना अनेक महिलांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रासातुनच महिलांचे आरोग्य बिघडण्यास सुरुवात होते. उच्च रक्तदाब, वजन वाढणे, कोलेस्ट्रोलची वाढ, मधुमेह असे अनेक आजार उद्भवून शेवटी याची परिणती हृदयविकारात होते. लॉकडाऊन संपल्यानंतर अनेक नोकरदार महिलांनी सुडौल राहण्याच्या अट्टहासातून डॉक्टरांच्या सल्याशिवाय वजन कमी करण्याच्या गोळ्या व इतर औषधे घेत असून यांच्या नियमित सेवनामुळे रक्तदाब तसेच रक्तामध्ये गुठळी होण्याची शक्यता कैक पटीने वाढते.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नोकरी न करता केवळ चूल आणि मूल म्हणजे घरची जबाबदारी सांभाळणारी महिला ही सोशीक वृत्तीची असल्यामुळे अनेकवेळा या महिला आपल्याला होणारा त्रास अथवा शारीरिक समस्या कुटुंबापासून लपवून ठेवतात. बहुतेक वेळा नोकरदार अथवा घराची जबाबदारी सांभाळणाऱ्या महिला आपल्याला होणारा त्रासावर वेळीच तपासणी करून घेत नाहीत.

आज भारतातील प्रमुख शहरांमधील महिला ही पूर्णपणे आत्मनिर्भर आहे. मात्र लॉकडाऊनमुळे अनेक महिलांच्या नोकऱ्या गेल्या. तसेच अनेक महिलांचे व्यवसाय बुडाले. त्यामुळे अनेक महिला या मानसिक ताणतणावाला बळी पडत असून अनेक महिलांमध्ये धूम्रपान तसेच मद्यपानाचे प्रमाण वाढीस लागले आहे. मानसिक ताणतणाव, धूम्रपान, खाण्याच्या बिघडलेल्या सवयी तसेच पुरेशी झोप न मिळाल्यामुळे आरोग्य बिघडून त्याच्या परिणामी हृदयविकाराचा त्रास होण्याचे प्रमाण महिलांमध्ये वाढले आहे, त्यामुळे महिलांना तिशीमधेच हृदयविकार होऊ शकतो हे लक्षात घेऊन शहरामध्ये राहणाऱ्या नोकरदार तसेच व्यावसायिक महिलांनी आपल्या आरोग्याची नियमित तपासणी करणे गरजेचे आहे.

एका वैद्यकीय संशोधनानुसार भारतामध्ये लॉकडाऊन काळामध्ये २७.५ टक्के नागरिकांमध्ये वजन वाढ आणि ३३.४ टक्के नागरिकांमध्ये लठ्ठपणा असल्याचे समोर आले आहे. महिलाचे वजन साठच्या वर असेल तर अनियमित मासिक पाळीच्या समस्यांत वाढ होते तसेच गर्भधारणेमध्ये अडचणी येतात. वजनवाढीमुळे महिलांमध्ये थायरॉईड, उच्च रक्तदाब तसेच मधुमेहात वाढ होते. भारतातील महिलांचे सरासरी आयुर्मान ७० वर्षांचे असल्यामुळे वयाच्या पन्नाशीनंतर महिलांनासुद्धा पुरुषांइतकाच हृदयविकाराचा धोका असतो. दर चारपैकी एका महिलेला एखादा हृदयविकार जडला असल्याचे अनेक अभ्यासाअंती आढळून आले आहे. भारतामध्ये कुटुंबाकडून महिलांना दुय्यम वागणूक मिळत असल्यामुळे त्यांच्या हृदयविकाराच्या लक्षणांकडे दुर्लक्ष होऊन पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये हृदयविकाराचे निदान उशीरा होते अशी माहिती हृदयशल्यविशारद डॉ. संजय तारळेकर यांनी दिली.