10 september national suicide preventable day

अभिनेता सुशांतसिंह राजपूत (Sushant sing rajput) याच्या आत्महत्येचा विषय सध्या माध्यमांमध्ये सर्वाधिक चालतो आहे. याशिवार सिनेसृष्टीतील इतरही काही जणांनी याच कालावधीत आत्महत्या केल्याने तरुणाईत आत्महत्या हा विषय अधोरेखित झाला आहे जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अहवालानुसार भारतात २० कोटी लोकांना प्रत्यक्ष मानसिक आरोग्याच्या सुविधांची आवश्यकता असून नैराश्यग्रस्त (depression) व्यक्ती असलेल्या देशात भारताचा सहावा क्रमांक लागतो.

जागतिक आरोग्य संघटनेने १० सप्टेंबर हा दिवस जागतिक आत्महत्या प्रतिबंध (world suicide prevention day) दिवस म्हणून जाहीर केला असून कोरोना संक्रमणाची पार्श्वभूमी लक्षात घेता या दिवसाला अधिक महत्व प्राप्त झाले आहे. आत्महत्या ही मानसिक तणावातून केली जाते, परंतु कालानुरूप आत्महत्यांची कारणे मोठ्या प्रमाणात बदललेली आहे. अगदी लहानशी निरर्थक वाटणारी गोष्ट आत्महत्येचे कारण बनते आणि समाजातील मानसिकता चव्हाट्यावर आणते.

भारतामध्ये  २०१८  आणि २०१९ या दोन वर्षाच्या काळातील आत्महत्याच्या आकडेवारीची तुलना केली तर २०१९ मध्ये  तरुणांच्या आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. २०१८ मध्ये ८९४०७  तरुणांनी आत्महत्या केली होती तर २०१९ मध्ये सुमारे १.३९ लाख लोकांनी आत्महत्या केली, त्यापैकी  ९३०६१ जण तरुण वयोगटातील होते म्हणजेच २०१९ मध्ये  आत्महत्यांमध्ये ४.४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

२०१९ मध्ये आत्महत्या करणाऱ्या नागरिकांमध्ये ६७ टक्के तरुण लोक होते, ज्यांचे वय १८ ते ४५ वर्षांदरम्यान आहे. यामध्ये कौटुंबिक समस्या, लग्नाशी संबंधित समस्या मानसिक आजाराच्या  समस्या तसेच  ड्रग्ज आणि अल्कोहोलच्या व्यसनामुळे व प्रेम संबंधातून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या ही काही अचानक घडणारी घटना नाही, कारण आत्महत्या करणारी व्यक्ती ही प्रथम  मानसिक रित्या आजारी पडते आणि त्यांची दखल अथवा त्यावर उपाय होत नसल्यामुळे आत्महत्या वाढत असल्याचे डॉक्टरांचे मत आहे.


तरुण पिढींमध्ये सहनशीलता फारच कमी असल्यामुळे अनेक तरुण निराशेच्या गर्तेत  व्यसनाच्या आहारी जातात. घरच्या व्यक्तींकडून तर कधी जवळच्या मित्र मैत्रिणीकडून अवहेलना झाली तर ही तरुण मंडळी लगेच व्यसनाला जवळ करतात, प्रेमभंग झाला, अपयश आले तर हिंदी चित्रपटातील नायक दारूची बाटली तोंडाला लावतात हे लहान वयात  नकळत संस्कारही याला कारणीभूत असल्याचे तज्ञ सांगतात.

आज प्रत्येक व्यक्तीची ही जबाबदारी आहे की  त्यांनी आपल्या संपर्कात येणाऱ्या लोकांशी सुसंवाद साधला पाहिजे कारण सर्वच निराशाग्रस्त नागरिकाला समुपदेशक अथवा इतर मदत मिळतेच असे नाही. संपर्कात असलेल्या व्यक्तीत झालेले मुख्य बदल, तसेच त्यांच्या बदललेल्या सवयी यावर आपण लक्ष दिले तर प्रत्येक नागरिक हा समुपदेशक बनू शकेल, कारण या व्यक्तीना आपले म्हणणे ऐकणारा म्हणजेच संवाद साधणारा व्यक्ती हवा असतो.


कोरोना या महामारीच्या आजारामुळे समाजामध्ये असहाय्यता, अनिश्चितता,एकांतवास आणि आर्थिक ताण तणाव व नात्यांमध्ये दुरावा वाढला आहे  परिणामी नैराश्य, चिंता, झोपेचे आजार व एकूणच  मानसिक विकार वाढले असून  याचा परिणाम म्हणून संपूर्ण जगात आत्महत्यांचे प्रमाण वाढण्यास कारणीभूत आहे. या नैराश्याला बळी न पडता साकारात्मकतेसाठी प्रयत्नशील राहणे याला प्राथमिता देणे गरजेचे आहे.