औषधी घेताना तुम्ही ‘या’ चुका तर करत नाही ना?

काही अभ्यासानुसार ४७ टक्के पालक हे मुलांना ताप, सर्दी आणि डोकेदुखी असताना योग्य प्रमाणात औषधे देत नसल्याचे समोर आले आहे.

  आजार झाल्यावर योग्य वेळेत उपचार घेणे गरजेचे ठरते. मात्र, त्यासोबतच योग्य प्रमाणात, तसेच योग्य वेळी औषधे घेणे महत्त्वाचे असते. विशेषतः मुलांच्या बाबतीत या गोष्टींचा विसर पडता कामा नये. काही अभ्यासानुसार ४७ टक्के पालक हे मुलांना ताप, सर्दी आणि डोकेदुखी असताना योग्य प्रमाणात औषधे देत नसल्याचे समोर आले आहे. यामुळे काही वेळा गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे औषधांचा वापर करताना चूक होणार नाही याची काळजी घेणे महत्त्वाचे ठरते.

  औषधे मोजण्यासाठी त्यांच्यासोबत देण्यात आलेल्या ‘मेजरिंग ग्लास’चा वापर करावा. मेजरिंग ग्लास नसेल, तर सुई नसलेल्या सिरिंजचा वापर औषध मोजण्यासाठी करावा. त्यामुळे औषध योग्य प्रमाणात मोजण्यास मदत होते.

  ‘एक्सपायरी डेट’च्या आधी औषध संपवावे

  औषधांचे प्रमाण मुलांच्या वयानुसार नव्हे, तर वजनानुसार ठरवायला हवे. एकाच वयाच्या मुलांचे वजन एकसारखे नसते. काही मुले कमी वजनाची, तर काहींचे वजन जास्त असते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मुलांना औषधे द्यायला हवीत. शंका आल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. औषधाच्या प्रमाणाबद्दल माहिती स्पष्ट झाली नसल्यास डॉक्टरांना पुन्हा विचारण्यास हयगय करू नये.

  अनेक जण औषधे चमचाने मोजतात. मात्र, ही चुकीची पद्धत आहे. सर्व चमचे हे एकाच आकारचे नसतात. त्यामुळे औषधाचे प्रमाण कमी जास्त होण्याची शक्यता असते. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे खरेदी केल्यास त्यांचे प्रमाण स्वतः ठरविणे योग्य नसते. ही पद्धत टाळायला हवी.

  पहिल्यांदा औषधांचा संपूर्ण तपशील वाचून घ्या. मुलांसाठी संबंधित औषध सुरक्षित आहे का, हे पाहा. उदाहरणार्थ इबुप्रोफेन हे औषध सहा महिन्यांच्या आतील मुलांसाठी दिले जात नाही. ‘अॅस्पिरीन’ लहान मुले आणि तरुणांसाठी सुरक्षित नाही.