हिंगोली जिल्ह्यासाठी १० मेट्रीक टन ऑक्सिजन साठा आरक्षित; खासदार हेमंत पाटील यांची माहिती

    हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात कोरोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होतो. यापूर्वी हिंगोली जिल्ह्यासाठी ऑक्सिजन कुठेही आरक्षित नव्हता. आता जिल्ह्यासाठी 10 मेट्रीक टन ऑक्सिजन साठा आरक्षित करण्यात आला असल्याची माहिती हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी दिली आहे.

    याचबरोबर जिल्ह्यातील 24 प्राथमिक आरोग्य केंद्रे ही कोविड सेंटर्समध्ये रूपांतरित करण्यात आली आहेत प्रत्येक आरोग्य केंद्रांमध्ये पंधरा बेड व पाच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा झाला होता परंतु आता 11200 लसींचा साठा उपलब्ध झाल्या आहेत.

    हिंगोली जिल्ह्यात एकही कार्डियाक अम्बुलन्स नव्हती खासदार हेमंत पाटील व कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांच्या निधीतून प्रत्येकी एक अशा दोन कार्डियाक ॲम्बुलन्स देखील आता जिल्ह्याला उपलब्ध होणार आहेत. जिल्ह्यातील रुग्णालयात असणारी स्टाफची कमतरता आता भासणार नाही कारण येत्या आठ दिवसात डॉक्टर्स व इतर स्टाफ देखिल भरती करण्यात येणार आहेत. असं पाटील बोलत होते.

    जिल्हा रुग्णालयात आरटीपीसीआर चाचण्यांसाठी आणखी मशीन्स देखील उपलब्ध होणार आहेत. हिंगोली जिल्ह्यात आता हिंगोली, कळमनुरी, औंढा नागनाथ आणि वसमत येथे 39 के.एल. ऑक्सीजन स्टोरेज टँकची निर्मिती होणार आहे. जिल्ह्यातील बारा अधिकृत खाजगी कोविड केअर सेंटर्सना देखील ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील कोरोनाबाधित रूग्ण,त्यांच्या नातेवाईकांनी व नागरिकांनी काळजी करण्याचे कारण नाही असे खासदार हेमंत पाटील म्हणाले.