
आदमाने कुटुंब गेल्या तीन पिढ्यांपासून गुलाल करण्याचे काम करत आहे. पारंपरिक पद्धतीने गुलाल तयार करण्यासाठी ते मक्याचे पीठ म्हणजेच आरारोट, रंग आणि पाण्याचा उपयोग केला जातो. त्यानंतर ते मिश्रण उन्हात वाळवले जाते, त्यानंतर तयार होतो गुलाल.
नागपूर : उत्सवप्रिय आपल्या भारत देशात होळीच्या धुळवळीला वेगळेच महत्त्व आहे. मनसोक्तपणे रंगांची उधळण करणाऱ्या प्रत्येकाला होळीची प्रतीक्षा असते. आपल्या देशातील काही भागात तर, होळी खेळण्यास सुरुवात देखील झालेली आहे. मात्र होळीत ज्या गुलालाची उधळण केली जाते, तो रंग म्हणजेच गुलाल कसा तयार होतो हे अनेकांना माहीत सुद्धा नसेल.
नागपूरतील वाठोडा येथील श्रीकृष्ण नगर मध्ये आदमाने कुटुंब गेल्या तीन पिढ्यांपासून गुलाल करण्याचे काम करत आहे. पारंपरिक पद्धतीने गुलाल तयार करण्यासाठी ते मक्याचे पीठ म्हणजेच आरारोट, रंग आणि पाण्याचा उपयोग केला जातो. त्यानंतर ते मिश्रण उन्हात वाळवले जाते, त्यानंतर तयार होतो गुलाल. होळीचा उत्सव म्हंटल की सर्वात आधी विविध रंगांची उधळण डोळ्यासमोर येते. गेल्या काही वर्षात होळीचे रूप आणि स्वरूप दोन्ही बदलले आहे. पारंपरिक रंगाच्या जागी रासायनिक रंगांचा वापर वाढला आहे. त्यामुळेच, त्वचा विकार देखील वाढू लागले आहेत. रासायनिक रंगांमुळे नुकसान होत असल्याने अनेकांची इच्छा असताना देखील धुळवड खेळने देखील सोडून दिले होते. त्यामुळे आता होळीत ग्राहकांकडून नैसर्गिक रंगांची मागणी केली जाते, त्यातही आता केवळ गुलालाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
नागपुरात एक असं कुटुंब आहे जे वर्षभर गुलाल तयार करून तो होळी, गणेशोत्सव, दिवाळीसह निवडणुकीत विक्री करतात. दोन वर्षांनी गुलालाची मागणी वाढली. गुलाल तयार करणे हा आदमने कुटुंबाचा पारंपरिक व्यवसाय आहे. आज तिसरी पिढी या कामात गुंतलेली आहे. गुलाल तयार केल्यानंतर तो विकूनच आदमने कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो, मात्र गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे गुलालाची मागणी कमी झाली होती. या वर्षी कोरोनाचे संकट दूर झाल्यामुळे गुलालाची मागणी पुन्हा जोर धरत असल्याचे ते सांगतात. गुलाल तयार करताना नैसर्गिक पद्धतीचा अवलंब केला जातो, असे त्यांनी सांगितले आहे.
होळी असो की निवडणुकीच्या मिरवणूका किंवा निकाल यामध्ये सर्वात जास्त गुलालाची मागणी केली जाते. लोकांमध्ये रंगाच्या संदर्भात जागृती आल्यामुळे हर्बल रंगांची मागणी वाढली आहे. त्यातही गुलाल नैसर्गिक पध्दतीने तयार केला जात असल्याने गुलालाची सर्वाधिक मागणी आहे.