
केज तालुक्यातील विडा येथे धुलीवंदनाला जावयाची गाढवावरून मिरवणूक काढली जाते. गेल्या 90 वर्षापासून ही परंपरा सुरूच आहे.
बीड :बीडच्या (Beed) विडा गावात निजाम काळात सुरू झालेली परंपरा आजतागायत कायम आहे. धुलीवंदनाच्या(Holi 2023) दिवशी गावात जावयाची गाढवावरून मिरवणूक (Son In Law Procession) काढण्याची विडा गावातली परंपरा आहे. या अनोख्या परंपरेचे जतन आजही इथले ग्रामस्थ करत आहेत.
केज तालुक्यातील विडा येथे धुलीवंदनाला जावयाची गाढवावरून मिरवणूक काढली जाते. गेल्या 90 वर्षापासून ही परंपरा सुरूच आहे. जावई म्हटलं की सासरकडील मंडळी इतर वेळी आपल्या जावयाच्या पुढे पुढे करताना पाहायला मिळतात. मात्र विड्यात ही आगळी वेगळी परंपरा आहे. यासाठी ग्रामस्थांना दरवर्षी जावयाचा शोध घेण्यासाठी दमछाक होते. यावर्षी अविनाश करपे यांना हा मान मिळाला आहे. रात्री दीड वाजता त्यांना ग्रामस्थांनी शोधून गावात आणले आहे. आज अविनाश करपे नावाच्या जावयाची मिरवणूक मोठ्या थाटामाटात काढण्यात आली. मिरवणूक झाल्यानंतर गावातील हनुमान मंदिराच्या पारावर ग्रामस्थांकडून या जावयाला आहेरदेखील देण्यात आला. सध्या ही आगळीवेगळी मिरवणूक सगळीकडे चर्चेचा विषय बनली आहे.