Weekly Horoscope December 27 to January 2, 2021 nrng
साप्ताहिक राशी भविष्य दि. २७ डिसेंबर ते २ जानेवारी २०२१; जाणून घ्या अशी आहे या आठवड्यात ग्रहांची चाल

मेष : आर्थिक चिंता मिटेल

मागील काही दिवसांपासून ठरवलेले नियोजन पूर्णत्वाला जाईल. त्यासाठी लागणारी आर्थिक चिंता मिटेल. नोकरीत मिळणारी जबाबदारी योग्यरीत्या पार पाडाल. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल.  दिरंगाई कमी होईल.

व्यापारीवर्गाला कामातून उसंत मिळणार नाही. गिऱ्हाईकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी घाईचे वातावरण निर्माण होईल. केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. आतापर्यंत केलेल्या तडजोडीचा कालावधी कमी होईल. आवक वाढती राहील.  सार्वजनिक  क्षेत्रात मनासारख्या घटना घडत राहतील. मित्रांचे सहकार्य मिळेल. संततीविषयी कौतुकास्पद गोष्टी घडतील. आजोळकडील पाहुण्यांची वर्दळ राहील. अध्यात्मातील गोडी वाढेल. शारीरिकदृष्टय़ा योगसाधनेला महत्त्व द्याल.

वृषभ : मंगल गोष्टींची चाहूल

थोडक्यात बिघडणाऱ्या गोष्टी सावरल्या तर ग्रहांचे प्राबल्य चांगले राहील. इतरांचे विचार घेऊन स्वतचे मत तयार करा. दुसऱ्याच्या बोलण्याचा कांगावा करू नका. अति शिष्टपणासुद्धा कामाचा नाही हे लक्षात ठेवा. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना योग्य दिशा मिळेल.

नव्या नोकरीचे नियम मात्र स्वीकारावे लागतील. मोठय़ा उद्योगिकीकरणाला मिळणारे साहाय्य मोलाचे ठरेल. ज्येष्ठ व्यक्तींकडून प्रत्यक्ष स्थितीच्या गोष्टींचा आढावा घेतला जाईल. त्यातून मिळणारा लाभ निश्चित नुकसान कमी करणारा असेल. मजूरवर्गाला धीर मिळेल. खर्च आटोक्यात ठेवला तर पैशाच्या अडचणी कमी होऊ लागतील. समाजसेवेची आवड निर्माण होईल. अविवाहित व्यक्तींना मंगल गोष्टींची चाहूल लागेल. घरातील वातावरण प्रसन्न राहील. प्रकृतिस्वास्थ्य उत्तम असेल.

मिथुन  : प्रश्नांतून सुटका होईल

सध्या अनुकूल वातावरणाची चाहूल मोठा दिलासा देणारी ठरेल. नोकरीमध्ये आपली पकड मजबूत असेल. मोकळीक मिळाल्याने आत्मविश्वास वाढेल. महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा होईल. वरिष्ठांचे मार्गदर्शन सकारात्मक दृष्टिकोनातून असेल. व्यवसायात मात्र यशाचा टप्पा गाठताना गतकाळातील चुका टाळा. कष्टाचे चीज होत राहील. भागीदारी व्यवसायात होणाऱ्या निर्णयात प्रत्यक्ष सहभागी व्हा. उधारी वसुलीतून आवक वाढू शकते आर्थिक प्रकरणात अपेक्षित प्रतिसाद मिळत राहील. एकंदर अनेक प्रश्नांतून सुटका होईल. राजकीय क्षेत्रातील बदलते वातावरण स्वीकारून पुढे जा. कोर्ट व प्रलंबित प्रकरणातील प्रतिकूलता कमी होईल. वैवाहिक जीवनात होणाऱ्या शुभ घटनांमधून सप्ताहाची वाटचाल आश्वासकपणे करता येईल. आध्यात्मिक उपक्रमांमध्ये मन रमवा. आरोग्याची काळजी घ्याल.

कर्क : पर्यायी गोष्टी स्वीकारा

रवि हर्षल यांचा चंद्रासमवेत होणारा योग डावलून चालणार नाही. आपल्याला कोणीतरी तारणारा येईल. आपली कामे मार्गी लावेल अशा भ्रमात राहू नका. मात्र स्वतहून केलेल्या प्रयत्नांना चांगले यश मिळणार आहे. नोकरीच्या ठिकाणी कामाचे प्रमाण वाढणार असेल. तरीसुद्धा स्वतची कुवत सिद्ध करता येईल. नोकरदार व्यक्तींनी कोणावर विसंबून राहू नका. व्यवसायात मोठय़ा प्रकल्पाची पायाभरणी करू शकाल. या कामाचे चांगले तंत्र आत्मसात करता येईल. अनेक स्तरावर आपला शब्द प्रमाण मानला जाईल. पण पर्यायी गोष्टी स्वीकाराव्या लागतील .आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी बनाल. सामाजिक स्तरावर गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ देऊ नका. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वारे वाहू लागेल. आरोग्य उत्तम राहील.

सिंह : तडजोडी फलदायी ठरतील

परिस्थिती पूर्णत: अनुकूल नसली तरी जुन्या लांबलेल्या प्रश्नांना चांगली वाट मिळेल. प्रतिकूलतेवर मात करण्यासाठी आतून उत्साह वाढेल. नोकरदारांची वाटचाल भरधाव राहील. दिलेले काम वेळेत पूर्ण करा. संशोधन क्षेत्रातील लोकांना महत्त्वाचे संशोधन हाती येईल. व्यापारी व्यक्तींनी केलेली गुंतवणूक व खरेदी यांचा योग्य उपयोग करून घेता येईल. बँक प्रकरणात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. स्वतच्या कौशल्यावर  प्रश्न मार्गी लावू शकाल. व्यापारवृद्धी मनासारखी होईल. येणारे नवे प्रवाह फलदायी ठरतील. तडजोडीतून दुहेरी लाभ समोर येतील. आर्थिक कामे मनासारखी होत राहतील. सार्वजनिक ठिकाणी करत असलेली चाकोरी सध्या बाजूला ठेवा. नवे नातेसंबंध निर्माण होतील. भाऊबंदकीच्या भानगडीत पडू नका. आरोग्याचे हित सांभाळा.

कन्या : अनुकूलता जाणवेल

आतापर्यंत ठरवलेली जिद्द पूर्णत्वाला जात नव्हती. अजूनही सुरुवातीस वाटणारा उत्साह टिकवून ठेवण्याची क्षमता उत्तम असेल. नोकरीमध्ये करार करताना कामाचा अनुभव सांगायला विसरू नका. अनोळखी व्यक्तींशी थेट संपर्क साधताना काळजी घ्या. व्यवसायात गिऱ्हाईकांची मने जपावी लागतील. अधोगतीचा मार्ग कमी होईल. उत्पादनात वाढ झाल्याने पळवाट काढावी लागेल. मोठय़ा कंत्राटदारांना अनुकूल हालचाली जाणवतील. नव्या व्यापाऱ्यांना नव्या उमेदीने व्यापारात उतरता येईल. कामाच्या पद्धतीत बदल करावे लागतील. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. नातेसंबंधांतून शुभ घटना घडतील. जोडीदाराकडून केले जाणारे प्रयत्न चांगले सफल ठरतील. मानसिकदृष्टय़ा मन:स्थिती चांगली राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. विश्रांती मिळेल.

तूळ : ज्येष्ठांचा सल्ला योग्य ठरेल

प्रामाणिकपणे केलेले कर्म कधीच वाया जाणार नाही, याचा अनुभव येईल. चंद्राचा शुभ ग्रहांशी होणारा योग गती वाढवणारा असेल. उशिरा का होईना मिळणारे फळ फलद्रूप होईल. सातत्याने भेडसावत असणारा प्रश्न मिटण्याच्या मार्गी असेल. नोकरदार व्यक्तीने आपल्या कामांमध्ये ज्येष्ठांचा सल्ला घेणे योग्य ठरेल. स्वतच्या स्वबळावर कामकाजाचे आयोजन करता येणे शक्य होईल. नोकरीवर असलेला कामाचा ताण तुम्ही कमी करू शकाल. व्यवसाय उद्योगधंद्यात प्रतिष्ठा पणाला लावण्याची गरज भासणार नाही. अनेक टप्पे पार पाडत पाऊलवाट संपली, असाच खडतर व्यावसायिक प्रवास संपेल. पशांची गुंतवणूक योग्य ठिकाणी करा. बचतीत वाढ होईल. राजकीय क्षेत्रात तुमची कारकीर्द उत्तम राहील. कुटुंबातील वातावरण खेळीमेळीचे असेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

वृश्चिक : शारीरिकदृष्टय़ा तंदुरुस्त

चंद्राचे भ्रमण भाग्यस्थानातून लाभस्थानाकडे होत आहे. याचा निश्चित परिणाम चांगला मिळेल. नोकरीतील सकारात्मक दृष्टिकोन वाढेल. वरिष्ठांचे दडपण कमी होईल. कामाचा बोजा हलका होईल. बौद्धिक क्षेत्रातील व्यवसायाला कलाटणी चांगली मिळेल .भागीदारी व्यवसायामध्ये बराच काळ गेल्यानंतर प्रगती दिसून येईल. उद्योगधंद्यातील क्षेत्र मोठय़ा चकमकीचे राहील. मागील त्रुटींचा आढावा घेऊन कामात बदल करावे लागतील. सर्वच स्तरावर मोठे पाऊल उचलणे शक्य होणार आहे. आर्थिक प्रश्न सुटतील. एकूणच सप्ताह चांगला राहील. समाजमाध्यमांचा वापर योग्य करण्यासाठी कराल. मित्रमंडळी व नातेवाईक यांचे सहकार्य उत्तम राहील. धार्मिक गोष्टींचा कल वाढेल. मानसिकदृष्टय़ा मनाला शांती लाभेल. शारीरिकदृष्टय़ा तंदुरुस्त राहाल.

धनू : व्यापारवृद्धी होईल

योग्य वेळ आल्यानंतरच चांगल्या गोष्टी घडतात याची जाणीव होईल. सुरुवात अडचणीची असली तरी हार मानू नका. लाभस्थानातील शुक्र चंद्राचा शुभयोग उत्तम ठरेल. भौतिक गोष्टींमध्ये वाढ होईल. शासकीय नोकरदारवर्गाला निश्चितच कामाचा वेग कमी होईल. होणारी गैरसोय कमी होईल. संपादक, पत्रकार, बातम्या इत्यादी क्षेत्रातील व्यक्तींना आपले मुद्दे योग्य पद्धतीने मांडावे लागतील. सुधारित योजनांचा पाठपुरावा करावा लागेल. व्यवसायात रचनात्मक बदल घडतील. जमीन खरेदी-विक्री व्यवसायातील व्यापारवृद्धी होईल. धडाडीने निर्णय घेणे सोपे जाईल. धनाचे मार्ग मोकळे होतील. राजकीय घडामोडींचा आढावा घेताना सतर्कता बाळगा. प्रत्येक गोष्ट नियमात राहून करा. सहकाऱ्यांकडून मिळणारा प्रस्ताव स्वीकारा. घरगुती वातावरण तप्त होऊ देऊ नका. प्रकृतिस्वास्थ्य उत्तम राहील.

मकर : सतत उद्योगी राहा

सप्ताहाच्या सुरुवातीला कामाचा उत्साह वाटणार नाही. पण आळस झटकून कामाला लागा. धरसोड वृत्ती बाजूला ठेवा. नोकरदार व्यक्तींनी आवाक्याबाहेरच्या गोष्टींना खतपाणी घालू नये. प्रत्येक स्तरावर दूरदृष्टीपणा ठेवा. लेखन क्षेत्रात अनेक नव्या कल्पना समोर येतील. त्या प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न असेल. व्यावसायिकदृष्टय़ा तुमची जबाबदारी इतरांवर लादू नका. स्वत: तत्पर राहून सतत उद्योगी राहण्याचा प्रयत्न करा. अंगीकृत असलेल्या कलाकौशल्याला यश मिळेल. भौतिक सुखाची ओढ राहील. पैशाचा योग्य ठिकाणी वापर केल्यास खर्चाला आळा बसेल. सामाजिक स्तरावर गरजवंतांची गरज पुरवणे हे तत्त्व सिद्ध करून दाखवाल. विवाहविषयक बोलणी होतील. कुटुंबातील गैरसमज वेळीच दूर करा. औषधांच्या वेळा व खाण्यापिण्याचे पथ्यपाणी सांभाळा.

कुंभ : सुवर्णमध्य काढा

चंद्राचे भ्रमण षष्ठस्थानातून अष्टमस्थानाकडे होत असताना मानसिकदृष्टय़ा स्थिर राहणे हिताचे राहील. प्रत्येक गोष्टीतून गैरसमज काढून बेसुरांचा सूर  वाढवण्यापेक्षा सुवर्णमध्य काढणे केव्हाही चांगला ठरेल. या ठिकाणी थोडे कष्ट वाढवावे लागतील. प्रत्येक पाऊल घाईने टाकून चालणार नाही. नियमावलीनुसार कामाचे नियोजन करा. व्यवसायात संधिसाधू व्यक्तींपासून लांब राहा. मोठय़ा उत्पादन क्षेत्रात गुंतवणूक करू नका. आहे त्यातच समाधान माना. मोठी स्वप्ने आत्ताच रंगवत बसू नका. त्यासाठी वेळ द्यावा लागेल. आर्थिक बाजू योग्य पद्धतीने सावरण्याचा प्रयत्न करा. भुरळ घालणाऱ्या गोष्टींपासून लांब राहा. कुटुंबातील वयोवृद्ध व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घ्या. अध्यात्मात राहून मानसिक शांतता ठेवण्याचा प्रयत्न करा. शारीरिक ताण ओढवून घेऊ नका.

मीन : नियमांचे पालन करा

सध्या अनुकूल वातावरण नसले तरी घाबरण्याचे कारण नाही. येणाऱ्या प्रश्नांवर लगेच प्रतिक्रिया देणे टाळा. अडचणींवर मात करत कार्यभार सांभाळा. नवीन नोकरीसाठी सध्या प्रयत्न करू नका. नोकरीच्या ठिकाणी धावपळीचे कामसुद्धा तुम्हाला चपळाईने करावे लागेल. व्यावसायिकदृष्टय़ा गिऱ्हाईकांची मने तुटणार नाहीत याचा प्रयत्न करा. फटकून बोलणे टाळा. दोलायमान परिस्थितीतून बाहेर पडा.

नवख्या व्यक्तींवर विश्वास ठेवू नका. कायदे क्षेत्रात नियमांचे पालन करा. उधार उसनवार करणे टाळा. खर्चावर नियंत्रण ठेवा. राजकीय क्षेत्रात माहीत नसलेल्या गोष्टींवर चर्चा करू नका.  कौटुंबिक जबाबदारी झटकू नका. उपासनेत मन रमवल्यास मानसिक समाधान वाढू शकेल. स्वतःच्या आरोग्याकडे  दुर्लक्ष करू नका.