देशभरात १४ दिवसांत ११ लाख रुग्ण; भारताने केली ब्राझीलशी बरोबरी

नवी दिल्ली : देशामध्ये रविवारी कोरोनाचे ९०,६३२ नवे रुग्ण आढळले असून हा आजवरचा उच्चांक आहे. एका दिवसात ९० हजारपेक्षा जास्त रुग्ण सापडलेला भारत हा जगातील पहिला देश बनला आहे. आता रुग्णांची एकूण संख्या ४१ लाखांवर पोहोचली आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३१ लाख ८० हजारांहून जास्त झाली. १४ दिवसांत रुग्णसंख्या ११ लाखांनी वाढली.

सर्वाधिक रुग्ण संख्येत अमेरिका प्रथम क्रमांकावर असून ब्राझील दुसऱ्या तर भारत तिसऱ्या स्थानी आहे. अमेरिकेत ६४,३२,१०३ तर ब्राझिलमध्ये ४१,२३,००० रुग्ण आहेत. भारताची संख्याही ४१,१३,८११ झाली आहे. सोमवारी भारत ब्राझीलवर मात करून दुसऱ्या स्थानी पोहोचण्याची शक्यता आहे.

अनलॉकच्या काळात कोरोनाचे संक्रमण वाढत असल्याचे चित्र असून पोलीसही याचे शिकार होत आहेत. चिंताजनक बाब म्हणजे गेल्या २४ तासांत राज्यभरात तब्बल ५११ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. आतापर्यंतचा बाधित पोलिसांचा हा सर्वाधिक दैनंदिन आकडा आहे. तर याच कालावधीत ७ पोलिसांना जीव गमवावा लागल्याने कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांचा आकडा १७३ वर गेला आहे.

राज्यातील २४ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

कोरोना विषाणूचा सर्वाधिक संसर्ग आरोग्य कर्मचाऱ्यांना झाला आहे. देशातील तब्बल ८७ हजार तर महाराष्ट्रतील २४ हजार ४८४ आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी राज्यातील २९२ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. पुणे येथे नुकतेच उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड सेंटरमध्ये काम पाहणाऱ्या लाईफ लाईन एजन्सीच्या ४० डॉक्टरांनी येथील असुविधांना वैतागून राजीनामे दिले आहेत.

त्यामुळे महापालिकेने लागलीच या ठिकाणी ४५ डॉक्टरांची नियुक्ती केली आहे. या सेंटरमधील सुविधा वाढविण्यात येत असल्याने दोन दिवस नव्या रुग्णांना भरती करून घेतले जाणार नाही.

महाराष्ट्रात कोरोनाचा कहर सुरूच असून सलग आठवडाभर रूग्ण संख्येत उच्चांकी वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत २३ हजार ३५० नवीन रुग्णांची नोंद झाली तर ३२८ जण दगावले. दिवसभरात ७ हजार ८२६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.