लॉकडाऊन शिथील केल्यावर लोकांचा ईएसआयसीकडे वाढला कल, जानेवारीत ११.५५ लाख नव्या सदस्यांची भर

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लावण्यात आलेला ‘लॉकडाऊन’मध्ये शिथिलता आणल्यानंतर ESIC योजनेशी संबंधित सदस्यांची संख्या वाढली. तसेच लोकांना नियमित वेतनावर रोजगार मिळाले.

    दिल्ली: कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ईएसआयसी)(ESIC) सामाजिक सुरक्षा योजनेत यंदा जानेवारीत ११.५५ लाख नवीन सदस्यांची भर पडली. आकडेवारीनुसार, जून २०२० मध्ये ईएसआयसीच्या योजनेत ८.८७ लाख सदस्य, मेमध्ये ४.८९ लाख आणि एप्रिलमध्ये २.६३ लाख सदस्यांची भर पडली.

    यावरून असे सूचित होते की, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लावण्यात आलेला ‘लॉकडाऊन’मध्ये शिथिलता आणल्यानंतर योजनेशी संबंधित सदस्यांची संख्या वाढली. तसेच लोकांना नियमित वेतनावर रोजगार मिळाले. जुलै २०२० मध्ये ईएसआयसी योजनेत सामील झालेल्या एकूण सभासदांची संख्या ७.६३ लाख होती, ती ऑगस्टमध्ये ९.५ लाख, सप्टेंबरमध्ये ११.५८ लाख आणि ऑक्टोबर २०२० मध्ये १२.०९ लाख झाली. त्याचबरोबर ती डिसेंबरमध्ये १२.२२ लाखांवर गेली. एनएसओच्या अहवालानुसार २०१९-२० मध्ये ईएसआयसीच्या योजनांमध्ये सामील झालेल्या सदस्यांची संख्या १.५१ कोटी होती जी सन २०१८-१९ मध्ये १.४९ कोटी होती.