मेघालयातून १५२५ किलो स्फोटके जप्त; ६००० डेटोनेटरसह ६ जणांना अटक

जयंतिया हिल्स जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात स्फोटके आणि डिटोनेटर जप्त

 

शिलाँग: मेघालयाच्या ईस्ट जयंतिया हिल्स जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात स्फोटके आणि डिटोनेटर जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी सहा जणांनाही अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका गाडीत मोठ्या प्रमाणात स्फोटके असल्याची गुप्त सूचना मिळाल्यानंतर बुधवारी रात्री या भागात पोलिसांनी सर्च ऑपरेशन हाती घेतले. या दरम्यान लाडरिमबाई पोलिस चौकी भागातील कोंगोंगमध्ये एक संशयित गाडीला पोलिसांकडून रोखण्यात आले.
सहाय्यक पोलीस महानिरीक्षक जी के इंगराई यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारमध्ये दहा पेट्या आढळल्या. या पेट्या २५० किलो स्फोटकांनी भरलेल्या होत्या. यामध्ये २५०० जिलेटीन कांड्याचाही समावेश होता. तसेच १ हजार डेटोनेटर जप्त करण्यात आले. पोलिसांनी ही गाडी घेऊन जाणाऱ्या दोघांना तत्काळ अटक केली. आरोपींच्या चौकशीत आणखी काही आरोपींची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर खलीहरियाट भागातून आणखी चौघांना अटक करण्यात आली. या दरम्यान पोलिसांनी घातलेल्या छाप्यात जवळपास १२७५ किलो स्फोटके (१०,२०० जिलेटिन कांड्यांसहीत) ५००० डेटोनेटर जप्त करण्यात आले.

आरोपींविरोध गुन्हा दाखल
इंगराई यांच्या माहितीनुसार, या मोहिमेत एकूण दीड हजारांपेक्षाही जास्त (१५२५ किलो) स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. आरोपींविरुद्ध विस्फोटक कायदा आणि इतर संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.