आंदोलक शेतकऱ्यांना ५० लाखांची नोटीस; योगी सरकारचा शेतकऱ्यांना दणका

नोटीस मिळाल्यानंतर शेतकरी नेत्यांनी सरकारविरोधात संताप व्यक्त केला आहे. भारतीय किसान युनियनचे नेते राजपालसिंह यादव यांनी आम्ही आपला हक्क मागणे हा गुन्हा नाही.

संभळ. उत्तर प्रदेशातील संभळ जिल्हा प्रशासनाने सहा आंदोलक शेतकऱ्यांना शांतता भंग केल्याप्रकरणी तब्बल ५० लाखांची नोटीस बजावली आहे. त्यानंतर ही रक्कम जास्त असल्याचे लक्षा आल्यावर ती ५० हजार करण्यात आली. या शेतकऱ्यांनी नव्या कृषी सुधारणा कायद्याविरोधात आंदोलन करताना शांततेचा भंग केला. यामुळे त्यांना नोटीस बजाविण्यात आली आहे, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

नोटीस बजावलेल्या सहा शेतकऱ्यांमध्ये भारतीय किसान युनियनचे जिल्हाध्यक्ष राजपालसिंह यादव, शेतकरी नेते जयवीरसिंह, ब्रह्मचारी यादव, सत्येंद्र यादव, राऊदास आणि वीरसिंह यांचा समावेश आहे. त्यांनी जिल्ह्यात केंद्राच्या तीन कृषी सुधारणा कायद्यांविरोधात आंदोलन केले होते. आंदोलकांनी सांततेचा भंग केल्यामुळे त्यांना ५० लाखाचा वैयक्तिक बाँड जमा करण्याची नोटीस बजाविण्यात आली आहे. मात्र, ही रक्कम शेतकऱ्यांसाठी मोठी असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी दिलेल्या दुसऱ्या अहवालानुसार शेतकऱ्यांना ५० हजार रुपये वैयक्तिक बाँड जमा करण्याची सूचना करण्यात आली आहे, असे सबिडिव्हिजन मॅजिस्ट्रेट दीपेंद्र यादव यांनी सांगितले.

हक्क मागणे गुन्हा नव्हे

नोटीस मिळाल्यानंतर शेतकरी नेत्यांनी सरकारविरोधात संताप व्यक्त केला आहे. भारतीय किसान युनियनचे नेते राजपालसिंह यादव यांनी आम्ही आपला हक्क मागणे हा गुन्हा नाही. आम्ही हा वैयक्तिक बाँड काही केल्या भरणार नाही. आम्हाला फाशी झाली तरी चालेल, पण आम्ही शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा देतच राहणार. याचबरोबर, भारतीय किसान युनियनचे विभाग अध्यक्ष संजीव गांधी यांनी, आमच्यापैकी कोणीही किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी या वैयक्तीक बाँडवर स्वाक्षरी केलेली नाही, असे स्पष्ट केले आहे.