केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, लवकरच होणार पगार वाढ

  महागाई भत्त्याची वाट पाहत असलेल्या केंद्र सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे. जुलै पासून केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता आणि महागाई सवलत (DR) मध्ये तीन टक्क्यांनी वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांच्या पगारात वर्षाकाठी जवळपास ३२ हजार ४०० रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. ही वेतनवाढ सातव्या वेतन आयोगातील नियमांनुसार होणार आहे.

  या महागाई भत्त्याचा लाभ कर्मचाऱ्यांना सप्टेंबर महिन्यापासून होण्याची शक्यता आहे. हा अहवाल अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक या आकडेवारीवर आधारित आहे. जानेवारी ते मे २०२१ या कालावधीत महागाई भत्त्याच्या तपशील असलेला AICPI अहवाल नुकताच जाहीर करण्यात आला असून जुलैपासून त्यामध्ये वाढ होईल अशी अपेक्षा आहे.

  १ जुलै नंतर कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता १७ टक्क्याहून वाढून २८ टक्के होणार आहे. म्हणजेच कर्मचाऱ्यांना दोन वर्षाचा महागाई भत्ता मिळेल.

  असे वाढणार ३२४०० रुपये

  तब्बल १८ महिन्यांनी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होणार आहे. मागील वर्षभरात कोरोनामुळे सरकारने कर्मचाऱ्यांचे भत्ते स्थगित केले होते. जानेवारी २०२० मध्ये महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ केली गेली होती. नंतर दुसऱ्या सहामाहीत म्हणजेच जून २०२० मध्ये ३ टक्क्यांनी वाढ केली. या वर्षीच्या जानेवारी महिन्यात ४ टक्क्यांनी वाढ झाली. म्हणजेच महागाई भत्ता एकूण २८ टक्के झाला.

  पे मॅट्रिक्स नुसार कर्मचाऱ्यांचा कमीत कमी पगार १८ हजार रुपये आहे. यामध्ये १५ टक्के महागाई भत्ता जोडला जाईल अशी आशा आहे. म्हणजेच दर महिन्याला तुमच्या पगारात २७०० रुपये वाढतील. म्हणजेच तुमच्या पगारात वर्षाकाठी ३२ हजार ४०० रुपयांची वाढ होईल.