‘मोदींचा अर्थ’ मसूद, ओसामा, दाऊद म्हणणाऱ्या अभिनेत्री विजयशांती भाजपात

हैदराबाद : हैदराबाद महापालिकेच्या निवडणुकीतील भाजपने मारलेली मुसंडी पाहून तेलंगण राष्ट्र समिती (टीआरएस) आणि काँग्रेसमधील असंतुष्ट नेत्यांच्या मनात चलबिचल सुरू झाली आहे. हे सर्व नेते भाजपकडे डोळे लावून बसले आहेत. अशातच, काँग्रेसमधून नुकताच राजीनामा दिलेल्या आणि ‘लेडी अमिताभ’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री विजयशांती यांनी सोमवारी भाजपात अधिकृत प्रवेश केला.

हैदराबाद : हैदराबाद महापालिकेच्या निवडणुकीतील भाजपने मारलेली मुसंडी पाहून तेलंगण राष्ट्र समिती (टीआरएस) आणि काँग्रेसमधील असंतुष्ट नेत्यांच्या मनात चलबिचल सुरू झाली आहे. हे सर्व नेते भाजपकडे डोळे लावून बसले आहेत. अशातच, काँग्रेसमधून नुकताच राजीनामा दिलेल्या आणि ‘लेडी अमिताभ’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री विजयशांती यांनी सोमवारी भाजपात अधिकृत प्रवेश केला. भाजपात सहभागी होण्यापूर्वी, रविवारी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि गृहराज्यमंत्री जी. कृष्ण रेड्डी यांची दिल्लीत भेट घेतली होती. यानंतर विजयशांती लवकरच भाजपात दाखल होतील, अशी शक्यता वर्तविली जात होती.

राजकीय कारकिर्द

विजयशांती यांना दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत लेडी अमिताभ म्हणून ओळखले जाते. विजयशांती यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात भाजपातूनच केली होती. १९७७ मध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. मात्र, तेलंगणाला स्वतंत्र राज्याच्या दर्जा द्यावा, या मागणीसाठी सुरू झालेल्या आंदोलनादरम्यान त्यांनी टीआरएस प्रमुख केसीआवर यांच्या पक्षात प्रवेश केला होता. यानंतर विजयशांती टीआरएसच्या तिकीटावर मेडक लोकसभा निवडणूक लढल्या आणि जिंकल्या. त्या २००९-२०१४ पर्यंत खासदार होत्या. यानंतर २०१४ साली त्यांनी टीआरएसची साथ सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

टीआरएस, काँग्रेसला खिंडार पडण्याची शक्यता

टीआरएसच्या कारभाराबाबत जनतेमध्ये मोठ्या प्रमाणावर असलेला असंतोष आणि निवडणुकीत काँग्रेसचे झालेले पाणीपत यामुळे या दोन्ही पक्षांमधील असंतुष्ट नेते भाजपमध्ये राजकीय भविष्य आजमावण्याचा विचार करत आहेत. यासाठी ते भाजप नेत्यांशी संपर्क साधण्याचा, पक्षात प्रवेश करण्यासाठी कारणे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. टीआरएस आणि काँग्रेसच्या राज्यातील आणखी काही बड्या नेत्याला भाजपात आणण्याचे प्रयत्न पक्षाकडून केले जात आहे. यामुळे काँग्रेसबरोबर सत्ताधारी ‘टीआरएस’लाही खिंडार पडण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.