राज्यपाल भगतसिंह कोश्यारींकडे गोव्याचा अतिरिक्त कार्यभार

राष्ट्रपती कार्यालयाने राज्यपालांच्या नियुक्ती आणि बदल्या या संदर्भात आदेश काढला आहे. गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची मेघालयचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तथागत रॉय यांना मेघालयच्या राज्यपाल पदावरुन मुक्त करण्यात आले आहे.

नवी दिल्ली:  महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे गोव्याच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रपती कार्यालयाने राज्यपालांच्या नियुक्ती आणि बदल्या या संदर्भात आदेश काढला आहे. गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची मेघालयचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तथागत रॉय यांना मेघालयच्या राज्यपाल पदावरुन मुक्त करण्यात आले आहे. 

तथागत रॉय हे २५ ऑगस्ट २०१८ पासून मेघालयचे राज्यपाल होते. याआधी २० मे २०१५ ते २५ ऑगस्ट २०१८ या कालावधीत ते त्रिपुराचे राज्यपाल होते. तथागत रॉय १४ सप्टेंबरला वयाची पंच्याहत्तरी पूर्ण करतील. त्यांनी राज्यपाल पदावरुन मुक्त करण्याची विनंती केल्यानंतर राष्ट्रपती कार्यालयाने त्यांना पदमुक्त केले. मेघालयचे नवनियुक्त राज्यपाल सत्यपाल मलिक ऑगस्ट २०१८ ते ऑक्टोबर २०१९ या कालावधीत जम्मू काश्मीरचे आणि ऑक्टोबर २०१९ पासून बदलीचा आदेश निघेपर्यंत गोव्याचे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत.

सत्यपाल मलिक २१ एप्रिल १९९० ते १० नोव्हेंबर १९९० पर्यंत केंद्रीय राज्यमंत्री होते. तसेच ते १९८०-८४ आणि १९८६ ते १९८९ पर्यत राज्यसभेचे खासदार होते. गोव्याचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणार असलेले महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ५ सप्टेंबर २०१९ पासून महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत.