सरकारी कर्मचाऱ्यांसाठी वाईट बातमी, महागाई भत्त्यानंतर प्रवास भत्त्याच्या वाढीवरही लगाम

यंदा जुलैमध्ये केंद्रीय कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता(DA) न वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे शासकीय कर्मचार्‍यांसह लाखो पेन्शनधारकांची कमालीची निराशा झाली आहे. आता ट्रॅव्हल अलाऊन्स (TA) देखील वाढविला जाणार नसल्याचेही समजते. 

    नवी दिल्लीः कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. त्यातच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.

    यंदा जुलैमध्ये केंद्रीय कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता(DA) न वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे शासकीय कर्मचार्‍यांसह लाखो पेन्शनधारकांची कमालीची निराशा झाली आहे. आता ट्रॅव्हल अलाऊन्स (TA) देखील वाढविला जाणार नसल्याचेही समजते.

    सातव्या वेतन आयोगाच्या वेतन मॅट्रिक्सच्या गणनेनुसार जुलै २०२१ मध्ये कर्मचार्‍यांचा डीए केवळ १७ टक्केच राहणार आहे. त्यामुळे यावर्षी टीए वाढणार नाही. यासंदर्भात राष्ट्रीय परिषद जेसीएममधील स्टाफ साईडचे सचिव शिवगोपाल मिश्रा म्हणतात, केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांचा टीए तेव्हाच वाढतो, जेव्हा डीए २५ % किंवा त्याहून अधिक असतो.

    प्रवासी भत्ता म्हणून केंद्रीय कर्मचार्‍यांना हॉटेल किंवा गेस्ट हाऊसमध्ये राहण्याचे पैसे, टॅक्सी खर्च आणि खाद्य बिले इत्यादी मिळतात. प्रवास भत्त्यामध्ये रस्ते, हवाई, रेल्वे आणि समुद्रमार्गाने प्रवास करण्याचे भाडे देखील समाविष्ट आहे.

    कोरोना महामारीमुळे केंद्र सरकारकडून सरकारी कर्मचार्‍यांना मिळालेला डीएचा लाभ गेल्या वर्षी जानेवारी महिन्यापासून थांबविला गेला. पण जुलैपासून तो पुन्हा सुरू होणार होता. अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांच्या उत्तरामुळे हे पक्क झालं होतं. जुलैमध्ये डीएच्या वाढीसह मागील थकबाकीही देण्यात येईल, असा विश्वास होता. यामुळे विद्यमान डीए १७ टक्क्यांवरून २८ टक्क्यांपर्यंत वाढेल, असा अंदाज होता. परंतु काही दिवसांपूर्वीच डिए वाढणार नसल्याचे समजले.