after lakshmi vilas bank rbi took action against mantha urban co operative bank maharashtra
लक्ष्मी विलास बँकेपाठोपाठ महाराष्ट्रातील या बँकेवर आरबीआयची कारवाई, घातले निर्बंध

लक्ष्मी विलास बँकेवर कठोर निर्बंध लागू करून २४ तास उलटत नाहीत तोच अजून भारतीय रिझर्व्ह बँकेने एका बँकेवर निर्बंध घातले आहेत.

नवी दिल्ली : लक्ष्मी विलास बँकेवर कठोर निर्बंध लागू करून २४ तास उलटत नाहीत तोच भारतीय रिझर्व्ह बँकेने आणखी एका बँकेवर निर्बंध घातले आहेत. महाराष्ट्रातल्या जालना जिल्ह्यातील मंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व्ह बँकेने कारवाई केली आहे. या कारवाई अंतर्गत बँकेला काही सूचना करण्यात आल्या असून, बँकेवर लादण्यात आलेले निर्बंध हे १७ नोव्हेंबर रोजी बँक बंद झाल्यापासून पुढचे सहा महिने लागू राहणार आहेत. अशी माहिती देण्यात आली आहे.

रिझर्व्ह बँकेने दिलेल्या सूचनेनुसार आता मंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला रिझर्व्ह बँकेच्या परवानगीशिवाय कुठलेही कर्ज किंवा उधारी देता येणार नाही. तसेच जुन्या कर्जांचे पुनर्गठण किंवा कुठलीही गुंतवणूक करता येणार नाही. तसेच बँकेवर नव्याने ठेवी स्वीकारण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच बँकेला कुठल्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार करण्याचा करार करता येणार नाही. मात्र रिझर्व्ह बँकेने हे निर्बंध लागू करण्यामागचे कारण सांगितलेले नाही.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये रिझर्व्ह बँकेला पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक (पीएमसी) मधील कथित अफरातफरीची कुणकुण लागली होती. त्यानंतर रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेवर निर्बंध घातले होते.तसेच बँकेला संकटातून वाचवण्यासाठी आरबीआयने २४ सप्टेंबर २०१९ रोजी बँकेतून पैसे काढण्यावरही मर्यादा घातली होती.

दरम्यान, केंद्र सरकारने लक्ष्मी विलास बँकेवर महिन्याभराच्या कालावधीसाठी अनेक प्रकारचे निर्बंध आणले आहेत. बँक खात्यातून पैसे काढण्यासाठी नवी मर्यादा घालून देण्यात आली आहे. त्यानुसार १६ डिसेंबरपर्यंत बँकेचे ग्राहक २५ हजार रुपयांपर्यंतची रक्कमच काढू शकतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केलेल्या शिफारशीनंतर सरकारने हे पाऊल उचललं. अर्थ मंत्रालयाने याबद्दलची माहिती दिली आहे.याआधी आरबीआयने येस बँक आणि पीएमसी बँकांसंदर्भातही अशाच प्रकारे निर्णय घेतले होते. त्यामुळे ग्राहकांना अडचणींना सामोरे जावे लागले होते.