शरद पवारांनंतर प्रशांत किशोर यांनी घेतली राहुल गांधींची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

पाच राज्यांच्या निवडणुका(Election) झाल्यानंतर राजकीय रणनीतीकार म्हणून काम थांबवण्याचे संकेत देणारे प्रशांत किशोर(Prashant Kishor) अचानक पुन्हा राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी का घ्यायला लागले आहेत? याविषयी आता चर्चांना उधाण आले आहे.

    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांची लागोपाठ दोनदा भेट घेतल्यानंतर प्रशांत किशोर यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Sharad Pawar Mate Rahul Gandhi)यांची भेट घेतली आहे. राहुल गांधी यांच्या निवासस्थानी ही भेट झाली.

    मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी प्रियांका गांधी, केसी वेणुगोपाल राव आणि हरीश रावत अशी पक्षातील काही वरीष्ठ मंडळी देखील हजर होती. त्यामुळे पाच राज्यांच्या निवडणुका(Election) झाल्यानंतर राजकीय रणनीतीकार म्हणून काम थांबवण्याचे संकेत देणारे प्रशांत किशोर अचानक पुन्हा राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी का घ्यायला लागले आहेत? याविषयी आता चर्चांना उधाण आले आहे.

    दरम्यान, आज राहुल गांधींसोबत झालेली भेट ही आगामी पंजाब विधानसभा निवडणुका आणि पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत वाद या पार्श्वभूमीवर झाल्याचं सांगितलं जात आहे.

    गेल्या महिन्याभरात प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांची दोनदा भेट घेतली आहे. त्यानंतर गेल्याच आठवड्यात त्यांनी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांची कपूरथला हाऊस या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. त्यानंतर आता प्रशांत किशोर यांनी राहुल गांधींची देखील भेट घेतल्यामुळे त्यासंदर्भात चर्चा सुरू झाली आहे.

    पंजाब काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुंदोपसुंदी सुरू आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांच्यामधील मतभेद विकोपाला गेल्याचं बोललं जात आहे. याचसंदर्भात गेल्या आठवड्यात नवज्योत सिंग सिद्धू यांनी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी आणि नंतर त्यांच्यासोबत राहुल गांधी यांची देखील भेट घेतली होती. पुढील वर्षी होणाऱ्या पंजाब विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंजाब काँग्रेसमध्ये निर्माण झालेला हा कलह पक्षासाठी त्रासदायक ठरू शकतो. याचसंदर्भात प्रशांत किशोर यांनी राहुल गांधींची भेट घेतल्याचं बोललं जात आहे.