yaas cyclone

बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा वेगाने वाढला आहे. येत्या २६ मे रोजी ‘यास’ चक्रीवादळ(Yaas Cyclone) भारताच्या पूर्व किनारपट्टीवर धडकणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

  देश तौक्ते चक्रीवादळाच्या(Cyclone Tauktae) तडाख्यातून थोडाफार सावरत आहे. अशातच आता भारताच्या पूर्व किनारपट्टीवर यास नावाचं नवं चक्रीवादळ घोंघावू लागलं आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा वेगाने वाढला आहे. येत्या २६ मे रोजी ‘यास’ चक्रीवादळ(Yaas Cyclone) भारताच्या पूर्व किनारपट्टीवर धडकणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

  हवामान खात्याने अंदाज वर्तवल्यानंतर आता केंद्र सरकारने देखील तयारी सुरू केली असून पूर्व किनारपट्टीवर ज्या ज्या राज्यांना ‘यास’ चक्रीवादळाचा धोका आहे, त्या राज्यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.आरोग्यविषयक यंत्रणा सज्ज ठेवण्याचे देखील निर्देश देण्यात आले आहेत. चक्रीवादळामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य परिस्थितीसाठी एनडीआरएफच्या तुकड्या देखील सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

  हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार, २६ मे रोजी यास चक्रीवादळ पश्चिम बंगाल किंवा ओडिशा या राज्यांच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. मात्र, केंद्र सरकारने सुरक्षेचा उपाय म्हणून पश्चिम बंगाल आणि ओडिशासोबतच आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि अंदमान-निकोबारमधील प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.

  केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देखील या राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून किनारी भागामध्ये आरोग्य व्यवस्था अधिक वाढवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्याशिवाय, यास चक्रीवादळाच्या मार्गात येणाऱ्या प्रदेशामध्ये असलेल्या रुग्णालयांमधील रुग्णांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी आवश्यक ती सर्व प्रकारची मदत देण्याचं आश्वास केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात आलं आहे.

  दरम्यान, २१ मेपासूनच बंगालच्या उपसागरातील परिस्थिती धोकादायक असणार आहे. वारे वेगाने वाहणार असून त्यामुळे समुद्र खवळलेला असू शकतो. त्यामुळे मच्छीमारीसाठी समुद्रात गेलेल्या मासेमारांनी आपल्या बोटी पुन्हा किनाऱ्यावर आणाव्यात, असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.

  अंदाजे २२ मेपासून हा कमी दाबाचा पट्टा उत्तर अंदमानजवळच्या समुद्रात तयार व्हायला सुरुवात होईल. २२ आणि २३ मे रोजी अंदमान-निकोबारमध्ये तुफान पाऊस होण्याची शक्यता आहे. अशीच पर्जन्यवृष्टी ओडिशा, पश्चिम बंगाल, मेघालय आणि आसाममध्ये देखील होईल. हे चक्रीवादळ तयार झाल्यास त्याच्या दिशेनुसार ओडिशा किंवा पश्चिम बंगाल या राज्यांच्या किनारी भागात धडकण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.