नारायण मूर्तींच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर राहुल गांधी म्हणाले, ‘मोदी है तो मुमकीन है’

इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी देशाच्या जीडीपीमध्ये स्वातंत्र्यानंतरची सगळ्यात मोठी घसरण होण्याची शक्यता असल्याचे नुकतेच एका कार्यक्रमात म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी मूर्तींच्या वक्तव्याचा संदर्भ देत ‘मोदी है तो मुमकीन है’ असा उपहासात्मक टोला लगावला आहे.

राहुल गांधी हे गेल्या काही दिवसांपासून अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीका करत आहेत. अर्थव्यवस्था आणि रोजगाराच्या बाबतीत आणखी वाईट स्थिती येणार असल्याचे ते म्हणत आहेत. आता नारायण मूर्ती यांनी अर्थव्यवस्थेची  आणखी वाईट स्थिती येणार असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशाच्या जीडीपीमध्ये स्वातंत्र्यानंतरची सगळ्यात मोठी घसरण होणार असल्याचे म्हटले आहे. जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये आणि जागतिक जीडीपीमध्येही कोरोनामुळे घसरण होणार असल्याचे मूर्ती यांनी सांगितले. त्यानंतर राहुल गांधींनी मोदी सरकारवर टीका केली.