श्रीराम मंदिरासाठी जमीन खरेदीत घोटाळ्याचा आरोप, २ कोटींच्या जमिनीचा 18 कोटींमध्ये व्यवहार! श्रीराम मंदिरासाठी जमीन खरेदीत घोटाळ्याचा आरोप, २ कोटींच्या जमिनीचा 18 कोटींमध्ये व्यवहार!

संपूर्ण जगातून श्रद्धेपोटी शेकडो कोटींचा निधी राम मंदिराच्या निर्माणासाठी दिला आहे. राम मंदिराच्या नावावर सामान्यांकडून देणगी घेण्यात आली आहे. श्रद्धेतून गोळा झालेल्या निधीचा गैरवापर होत असेल तर त्या श्रद्धेला काहीच अर्थ उरत नाही- शिवसेना खासदार संजय राऊत

  अयोध्या: श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टद्वारे अयोध्येत राम मंदिराचं निर्माण करण्यासाठी खरेदी करण्यात आलेलया जमिनीत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे माजी आमदार पवन पांडे यांनी केला आहे . ‘ट्रस्टचे सरचिटणीस चंपतराय यांनी संस्थेचे सदस्य अनिल मिश्रा यांच्या मदतीने दोन कोटी रुपये दराची जमीन १८ कोटी रुपयांमध्ये खरेदी कल्याचा आरोप त्यांनी केलाआहे, हे थेट पैशांच्या अफरातफरीचं प्रकरण असून सरकारने याची सीबीआय आणि ईडीमार्फत तपास करावा अशी मागणी पांडे यांनी केली आहे.

  श्रीरामच्या नावावर होत असलेल्या लूटमारांची चौकशी झाली पाहिजे
  आज विश्व हिंदू परिषदेवर हे आरोप केले जात आहेत. यात २ कोटींची जमीन ५ मिनिटांत १८ कोटी होत आहे. रामच्या नावावर पैशाची लूट होत नाही का? याची गंभीरपणे चौकशी झाली पाहिजे. सरकारने यासंदर्भात उच्चस्तरीय चौकशी केली पाहिजे, जर ही लूट झाली असेल तर त्या लोकांना सामान्य माणसांपेक्षा कित्येक पटीने अधिक शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी कॉंग्रेसचे प्रवक्ते सुरेंद्र राजपूत यांनी केली आहे.

  ही पूर्णपणे सावकारी आहे, चौकशी व्हायला हवी
  ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी संस्थेचे सदस्य अनिल मिश्रा यांच्या मदतीने १८ कोटींमध्ये २ कोटींची जमीन खरेदी केली. ही पूर्णपणे सावकारी आहे. सरकारने याची चौकशी सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालयामार्फत व्हायला हवी. संजय सिंह म्हणाले की, ट्रस्टचा सदस्य अनिल मिश्रा दोन कोटींची जमीन खरेदी आणि १८ कोटींच्या कराराचा साक्षीदार आहे.अशी मागणी आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय संजय सिंह यांनी केली आहे.

  “संध्याकाळी ७ वाजून १० मिनिटांनी झालेल्या या जमीन व्यवहाराचे साक्षीदार राम जन्मभूमी ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा आणि अयोध्याचे महापौर ऋषिकेश उपाध्याय बनले होते. मात्र त्यानंतर पाचच मिनिटांनी चंपत राय यांनी हिच जमीन सुलतान अन्सारी आणि रवी मोहन तिवारी यांच्याकडून साडे अठरा कोटी रुपयांमध्ये खरेदी केली. त्यापैकी १७ कोटी रुपये आरटीजीएसद्वारे देण्यात आल्याची माहिती सिंह यांनी दिली आहे.

  मात्र या सर्व आरोपांचे खंडन करत ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी “मी अशाप्रकराच्या आरोपांना घाबरत नाही. माझ्यावर झालेले आरोप मी तपासणार आहे.” असे म्हटले आहे.

  ट्रस्टचे प्रमुख, सरकार, सरसंघचालकांनी स्पष्टीकरण द्यायला हवं : शिवसेना
  “या प्रकरणी ट्रस्टच्या प्रमुखांनी समोर येऊन स्पष्टीकरण द्यायला हवं. सरकारने, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांनीही खुलासा करणं गरजेचं आहे. ज्यांनी अयोध्येसाठी मंदिरासाठी लढा दिला आहे, त्यांना कळणं गरजेचं आहे की, नक्की तिथे काय घडलं. संपूर्ण जगातून श्रद्धेपोटी शेकडो कोटींचा निधी राम मंदिराच्या निर्माणासाठी दिला आहे. राम मंदिराच्या नावावर सामान्यांकडून देणगी घेण्यात आली आहे. श्रद्धेतून गोळा झालेल्या निधीचा गैरवापर होत असेल तर त्या श्रद्धेला काहीच अर्थ उरत नाही,” अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली.

  हे राम, हे कसे दिवस काँग्रेसने काय म्हटलं?
  “हे राम, हे कसे दिवस… तुमच्या नावावर देणगी गोळा करुन घोटाळा होत आहे. बेशर्म लुटारु आता श्रद्धा विकत ‘रावण’प्रमाणे अहंकारात आहेत. प्रश्न आहे की, दोन कोटीमध्ये खरेदी केलेली जमीन १०मिनिटांनी ‘राम जन्मभूमी’ला १८ कोटी रुपयांत कशी विकली? आता तर वाटतं …कंसांचंच राज्य आहे, रावण आहे चहूबाजूने!”अशी टीका काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्वीट करत म्हटले आहे.