पीएम मोदींच्या विरोधात 2024 च्या निवडणुकीसाठी कोणते पक्ष एकत्र येणार? आज सोनिया गांधींनी बोलावली महत्त्वाची बैठक

सोनिया गांधी यांनी आज विरोधी पक्षांसमवेत 2024 च्या लोकसभा आणि विधानसभेच्या आगामी निवडणुकासाठी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. राजकीय घडामोडी आणि केंद्र सरकारच्या विरोधात एकजुट होण्यासाठी अनेक विषयांवर चर्चा  होण्याची शक्यता आहे. तसेच कॉमन मिनिमम प्रोग्राम वर सुद्धा चर्चा होऊ शकते. त्याचप्रमाणे अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेली गंभीर परिस्थिती यावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

    नई दिल्ली:  काँग्रेस पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी आज (शुक्रवार) समान विचारांच्या विरोधी पक्षातील नेत्यांची बैठक बोलावली आहे. यामध्ये जवळपास 15 पक्षांतील नेते सहभाग घेणार आहेत. ही बैठक व्हर्च्युअल माध्यमातून होणार असून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) हे देखील सहभागी होणार आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी आणि आगामी विधानसभा निवडणुकींच्या विषयावर महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

    सोनिया गांधी यांच्या बैठकीत ‘हे’ नेते सहभागी होण्याची शक्यता

    बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत सोनिया गांधी यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री एमके स्टालिन आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना देखील व्हर्च्युअल मीटिंगसाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. या व्यतिरिक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राजदचे तेजस्वी यादव, सीपीएमचे सीताराम येचुरी, सीपीआयमधून विनय विश्वम आणि सपा पक्षाचे नेते रामगोपाल यादव हे देखील मीटिंगला उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. तर या बैठकीमध्ये आम आदमी पार्टी आणि बीएसपीचे नेते सुद्धा सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

    बैठकीमध्ये या मुद्द्यांवर होऊ शकते चर्चा

    सोनिया गांधी यांनी आज विरोधी पक्षांसमवेत 2024 च्या लोकसभा आणि विधानसभेच्या आगामी निवडणुकासाठी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. राजकीय घडामोडी आणि केंद्र सरकारच्या विरोधात एकजुट होण्यासाठी अनेक विषयांवर चर्चा  होण्याची शक्यता आहे. तसेच कॉमन मिनिमम प्रोग्राम वर सुद्धा चर्चा होऊ शकते. त्याचप्रमाणे अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेली गंभीर परिस्थिती यावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज (20 ऑगस्ट) राजीव गांधी यांचा जन्मदिवस आहे. या शुभ दिनी सोनिया गांधींनी सर्व विरोधी पक्षांसमवेत महत्त्वाची बैठक बोलावली आहे.