अ‍ॅपलच्या हेडफोनची एन्ट्री; डिसेंबरपासून ‘एअरपॉड्स मॅक्स’ची विक्री सुरू होणार

अ‍ॅपलने आपला पहिला 'ओव्हर इयर हेडफोन' सादर केला असून, एअरपॉड्स मॅक्स असे त्याचे नाव आहे. या प्रीमियम हेडफोनची किंमत 59 हजार 900 रुपये ठरविण्यात आली असून या हेडफोन्सची पूर्वनोंदणी सुरू करण्यात आली आहे. 15 डिसेंबरपासून 'एअरपॉड्स मॅक्स'ची विक्री सुरू होणार आहे. स्पेस ग्रे, स्काय ब्लू, सिल्व्हर, पिंक आणि ग्रीन अशा रंगांमध्ये हे हेडफोन्स उपलब्ध करण्यात आले आहेत. अ‍ॅडाप्टिव्ह ईक्यू आणि अ‍ॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन ही या हेडफोन्सची विशेष फीचर्स आहेत.

मुंबई (Mumbai).  अ‍ॅपलने आपला पहिला ‘ओव्हर इयर हेडफोन’ सादर केला असून, एअरपॉड्स मॅक्स असे त्याचे नाव आहे. या प्रीमियम हेडफोनची किंमत 59 हजार 900 रुपये ठरविण्यात आली असून या हेडफोन्सची पूर्वनोंदणी सुरू करण्यात आली आहे. 15 डिसेंबरपासून ‘एअरपॉड्स मॅक्स’ची विक्री सुरू होणार आहे. स्पेस ग्रे, स्काय ब्लू, सिल्व्हर, पिंक आणि ग्रीन अशा रंगांमध्ये हे हेडफोन्स उपलब्ध करण्यात आले आहेत. अ‍ॅडाप्टिव्ह ईक्यू आणि अ‍ॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन ही या हेडफोन्सची विशेष फीचर्स आहेत.

या हेडफोन्समध्ये एच-वन चिपसेट असून, अ‍ॅक्सलरोमीटर आणि गायरोस्कोपही आहे. त्यामुळे ‘रिअल टाइम हेड मूव्हमेंट’चा माग घेणे शक्य होणार आहे. ऑप्टिकल आणि पोझिशन सेन्सर्सही या हेडफोन्समध्ये आहेत. त्यामुळे हे हेडफोन्स कानावरून काढले की आवाज आपोआप बंद होतो. स्पॅटियल ऑडिओ, ट्रान्स्परन्सी मोड यांसारखी अत्याधुनिक फीचर्सही ‘एअरपॉड्स मॅक्स’मध्ये देण्यात आली आहेत. त्याशिवाय स्टेनलेस स्टीलचा हेडबँडही त्याला आहे. त्यामुळे डोक्याच्या आकारानुसार त्याची अ‍ॅडजस्टमेंट करता येते. अ‍ॅपलच्या या हेडफोन्सना डिजिटल क्राउनही देण्यात आला आहे, ज्याच्या साह्याने आवाज कमी-जास्त करता येऊ शकतो. त्याच्या साह्याने गाणे सुरू करता येईल, थांबवता येईलच, शिवाय कॉल नियंत्रणही त्याद्वारे शक्य आहे. ‘एअरपॉड्स मॅक्स’मध्ये 40 मिलिमीटरची डायनॅमिक ड्रायव्हर आणि ड्युएल नियोडॉयमियम रिंग मॅग्नेट मोटर आहे. त्यामुळे याच्या आवाजाचा दर्जा उच्च आहे.

हा प्रीमियम वायरलेस हेडफोन एका वेळी चार्ज केल्यानंतर बॅटरी 20 तास टिकेल. अ‍ॅपलच्या लायटिंग कनेक्टरच्या साह्याने हे हेडफोन्स चार्ज करता येऊ शकतात. अ‍ॅपल एअरपॉड्स मॅक्स या हेडफोन्ससोबत एक मऊशार आणि बारीक ‘स्मार्ट केस’ही दिली जाणार आहे. त्यामुळे हेडफोन्सचे संरक्षण तर होईलच, पण त्या केसमध्ये हेडफोन्स ‘अल्ट्रा-लो-पॉवर स्टेट’मध्ये राहतील. फक्त पाच मिनिटे चार्ज केल्यानंतर या हेडफोन्सवर दीड तास श्रवणानंद लुटता येईल.