विधानसभा निवडणूक विश्लेषण : आक्रमक प्रचारामुळे पं. बंगालमध्ये भाजपाच्या मतांच्या टक्केवारीवरही परिणाम, तृणमूलच्या जागा वाढल्याच, सोबत मतांच्या टक्केवारीतही वाढ

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत बंगालमध्ये भाजपाला ४०.६ टक्के मते मिळाली होती, ती या निवडणुकीत ३८.१ टक्क्यांवर आली आहेत.लोकसभेप्रमाणेच यंदाही भाजपाला मते मिळाली असती तर भाजपाच्या आमदारांची संख्या १२५ पार होऊ शकली असती, आणि तृणमूल काँग्रेस १६० जागांवर थांबली असती.

    दिल्ली :  प. बंगालमध्ये भाजपाचा अश्वमेध रोखणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्या विजयाची चर्चा अजूनही सुरुच आहे. या विजयाची कारणेही शोधण्यात येत आहेत. मतांच्या टक्केवारीचा विचार केला तर तृणमूल काँग्रेसने २०१६च्या विधानसभा निवडणुका आणि २०१९ला झालेल्या लोकसभा निवडणुकांपेक्षाही जास्त मते मिळवली आहेत. तर प्रमुख विरोधी पक्ष ठरलेल्या भाजपाला गेल्या विधानसभा निवडणुकांपेक्षा २८ टक्के जास्त मते मिळाली आहेत. मात्र २०१९ च्या लोकसभा निवडणुकांपेक्षा यावेळी त्यांच्या वाट्याला कमी मते आली आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत बंगालमध्ये भाजपाला ४०.६ टक्के मते मिळाली होती, ती या निवडणुकीत ३८.१ टक्क्यांवर आली आहेत.लोकसभेप्रमाणेच यंदाही भाजपाला मते मिळाली असती तर भाजपाच्या आमदारांची संख्या १२५ पार होऊ शकली असती, आणि तृणमूल काँग्रेस १६० जागांवर थांबली असती.

    केरळ
    केरळचा विचार केला तर इथे सत्तेत परतलेल्या माकपाला लोकसभा निवडणुकांइतकी मते मिळाली नाहीत, माकपाची मते ०.६ टक्के कमी झाली आहेत. भाजपालाही लोकसभा निवडणुकांइतरी मते मिळाली नाहीत. मात्र २०१६च्या विधानसभा निवडणुकांपेक्षा मतांच्या टक्केवारीत ०.७ टक्के वाढ झाली आहे. लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक मते मिळवणाऱ्या काँग्रेसचे मोठे नुकसान झाले आहे. केरळात काँग्रेसच्या मतांच्या टक्केवारीत १२ टक्क्यांहून अधिक घट झाली आहे.

    तामिळनाडू
    तामिळनाडूत बहुमत मिळवणाऱ्या द्रमुकच्या मतांच्या टक्केवारीत २०१६ विधानसभा निवडणुकांपेक्षा लोकसभा निवडणुकीत १ टक्क्यांनी वाढ नोंदवली होती. या विधानसभा निवडणुकीत यात आणखी भर पडली आहे. लोकसभेपेक्षा ४.५ टक्के मते यंदा द्रमुकला जास्त मिळाली आहेत. अण्णा द्रमुकलाही लोकसभेपेक्षा १४ टक्के मते जास्त मिळाली आहेत. काँग्रेस आणि भाजपाला लोकसभा निवडणुकांच्या तुलनेते कमी मते मिळाली आहेत.