प्रेक्षकांचा भ्रमनिरास होणार नाही; टीव्हीवर कोरोनासंबंधित बातम्या न दाखवण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली; दिल्ली उच्च न्यायालयाचा दिलासादायक निर्णय

सध्या कोरोनामुळे बहुतेक लोक त्यांच्या घरी आहेत. बहुतेकदा घरातील सर्वजण एकत्र बसून टीव्ही पाहतात. यामध्ये आपण बर्‍याच वेळा वृत्तवाहिन्या पाहतो, जेणेकरून जगात काय चालले आहे याची माहिती मिळावी. परंतु बर्‍याचदा असे होते की जेव्हा आपण वृत्तवाहिन्या पाहतो तेव्हा तिथे कोरोना संबंधित मृत्यू, आकडेवारी या प्रकारची माहिती आणि बातम्या येतात त्यामुळे निराशेचे वातावरण तयार होते.

    नवी दिल्ली : देशात कोरोनाने थैमान घातलं आहे. त्यात टीव्हीवर दिवसभर कोरोनामुळे झालेले मृत्यू, स्मशानभूमी आणि रडणाऱ्या कुटुंबियांचे व्हिडिओ दाखवले जात आहेत. असे व्हिडिओ दाखवू नये या मागणीसाठी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल झालेली एक जनहित याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. ही याचिका फेटाळून लावताना उच्च न्यायालयाने म्हटलं की, सत्य दाखवणे हे मीडियाचे काम आहे. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची माहिती सांगणे याला नकारात्मक बातमी म्हणता येणार नाही.

    दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेत याचिकाकर्त्याने म्हटले होते की, सध्या कोरोनामुळे बहुतेक लोक त्यांच्या घरी आहेत. बहुतेकदा घरातील सर्वजण एकत्र बसून टीव्ही पाहतात. यामध्ये आपण बर्‍याच वेळा वृत्तवाहिन्या पाहतो, जेणेकरून जगात काय चालले आहे याची माहिती मिळावी. परंतु बर्‍याचदा असे होते की जेव्हा आपण वृत्तवाहिन्या पाहतो तेव्हा तिथे कोरोना संबंधित मृत्यू, आकडेवारी या प्रकारची माहिती आणि बातम्या येतात त्यामुळे निराशेचे वातावरण तयार होते. याचिकाकर्त्याने आपल्या याचिकेत मुले, वृद्ध लोक आणि आजारी लोकांचा हवाला देत असे म्हटले आहे की असे व्हिडिओज आणि माहिती ऐकल्याने ते अधिक निराश होतात. या दृश्याऐवजी लोकांना सकारात्मक गोष्टी दाखवल्या पाहिजेत, जेणेकरुन लोक या नकारात्मक वातावरणामधून बाहेर पडू शकतील.

    कोणत्याही न्यायालयात अशी याचिका दाखल होण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी मीडियाच्या कामकाजासंदर्भात उच्च न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयात वेगवेगळ्या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. मीडियाच्या कामाबाबत वेगवेगळ्या न्यायालयांनी आपल्या भूमिका मांडल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयानेही प्रसारमाध्यमांच्या कव्हरेजवर मनाई करण्याची मागणी करणाऱ्या याचिका फेटाळून लावल्या आहेत. लोकांसमोर तथ्य मांडणे हे मीडियाचे काम असल्याचे सांगत त्यांना हे काम करण्यास रोखू शकत नाही ,असं म्हटले होते.