१०० पैकी ९० रुग्ण योग, प्राणायाम आणि आयुर्वेदीक उपचार पद्धतीने झाले बरे, रामदेव बाबांनी पुन्हा अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांना डिवचले

वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या बाबा रामदेव(Baba Ramdev) यांनी एका मुलाखतीत(Interview) अनेक मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली.

    कोरोनावर अनेक प्रभावी लसी शोधण्यात आल्या. बाबा रामदेव यांच्या पंतजलि योगपीठानेही कोरोनावर(Corona) परिणामकारक औषध शोधल्याचा दावा केला. हे औषध केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या उपस्थिती बाजारातही आलं. मात्र बाजारात आलेल्या कोरोनील किटवरून वाद निर्माण झाला. केंद्राने कोरोनीलचा समावेश कोविड उपचार औषधांच्या यादीत केलेला नाही. दुसरीकडे अनेक राज्यात कोरोनील किट वाटलं जात आहे. या सगळ्या वादावर बाबा रामदेव(Baba Ramdev) यांनी एका मुलाखतीत उत्तर दिलं आहे.

    कोरोनाचा प्रसार वाढत असताना बाबा रामदेव यांनी अ‍ॅलोपॅथी उपचारपद्धतीची थट्टा उडवली होती. या विधानांवरून वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या बाबा रामदेव यांनी एका मुलाखतीत अनेक मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली.

    रामदेव बाबा म्हणाले की, “ज्या लोकांच्या शरीरातील ऑक्सिजन पातळी ७० टक्क्यांवर गेली होती. ते लोकही योग आणि घरगुती उपचाराने बरे झाले आहेत. ९० टक्के लोकांना रुग्णालयात जाण्याची गरज पडली नाही, असं डॉ. गुलेरिया म्हणालेत. मी म्हणतो की, ९५ ते ९८ टक्के लोकांवर रुग्णालयात जाण्याची वेळ आली नाही. हे सगळं आयुर्वेद आणि योगामुळे घडलं.’’

    केंद्र सरकारने कोरोना औषधांच्या किटमध्ये कोरोनीलचा समावेश का केला नाही? या प्रश्नाचे उत्तर देताना बाबा रामदेव म्हणाले,“हा आमचा दोष नाही, तो सरकारच्या धोरणांचा दोष आहे. तुम्ही हे आमच्यावर का लादता ? तुम्ही देशातील कोणत्याही शहरात जाऊन बघा, १०० पैकी ९० रुग्ण योग, प्राणायाम आणि आयुर्वेदीक उपचार पद्धतीने बरे झाले आहेत. मग असं कसं म्हणता की अ‍ॅलोपॅथी उपचारपद्धती व डॉक्टरांनीच लोकांचे जीव वाचवलेत ? अनेक डॉक्टरांनी स्वतःचे प्राण गमावून रुग्णांचे जीव वाचवले. त्यांचे आभारच. अशा संकटाच्या काळात त्यांना मदत करायलाच हवी ना, नाहीतर वैद्यकीय विज्ञानाला काय अर्थ राहिल ?”

    रामदेव बाबा म्हणाले की, “मी हे मान्य करतो की, कोरोनाच्या संसर्गामुळे प्रकृती गंभीर झालेल्या १० टक्के लोकांचे जीव डॉक्टरांनी वाचवले. पण ९० टक्के लोकांचे जीव आयुर्वेद, योग आणि नैसर्गिक उपचारांनी वाचवले आहेत. मग माझ्या बोलण्यावर डॉक्टरांचा आक्षेप का आहे ? कारण त्यांचा व्यवसाय याच्याशी संबंधित आहे. पण ते ताकदीच्या जोरावर सत्य लपवू शकत नाहीत. मी अ‍ॅलोपॅथीचा विरोधक नाहीय. अत्यावश्यक प्रसंगी उपचार करण्यासंदर्भात वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड काम केलं आहे. पण, लाईफस्टाईलमुळे निर्माण होत असलेल्या आजारांवर त्यांच्याकडे कोणताही उपाय नाही.”