भारतातील 5G इंटरनेट टॉवरच्या चाचण्यांवर बंदी घाला ; सुप्रीम कोर्टात याचिका

5 जी नेटवर्कच्या तंत्रज्ञानामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा वापर केला जातो, यामुळे कर्करोगाचा धोकादेखील मोठ्या प्रमाणात वाढतो. गर्भधारणेदरम्यान मोबाइल रेडिएशनचा स्त्रिया तसेच मुलांवरही परिणाम होतो. 5 जी नेटवर्क दहशतवाद्यांसाठी उपयुक्त ठरेल आणि देशाच्या सुरक्षेलाही मोठा धोका असल्याचे याचिकेत म्हटले आहे.

    नवी दिल्ली : इंटरनेट युजर्सच्या गोपनीयतेसाठी 5 जी सर्वात मोठा धोका असल्याचे म्हणत भारतात जी 5G इंटरनेट टॉवरसाठी चाचण्या सुरु आहेत त्यावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. विधीज्ञ ए. पी. सिंह यांनी ही याचिका दाखल केली आहे. याचिकेत म्हटले आहे की, आज भारतासह जगभरात 5G नेटवर्कला विरोध केला जात आहे.

    का आहे विरोध?

    5G नेटवर्क हा पृथ्वीसाठी एक मोठा धोका आहे, परंतु मोबाइल कंपन्यांनी 5G स्मार्टफोनची विक्रीदेखील सुरू केली आहे. इंटरनेट युजर्सच्या गोपनीयतेसाठी 5 जी सर्वात मोठा धोका असल्याचे या याचिकेत म्हटले आहे. यामुळे युजर्सचा डेटादेखील सहज हॅक होऊ शकतो. दरम्यान याचिकाकर्त्याने याचिकेमध्ये असेही नमूद केले आहे की, नेदरलँड्स येथे 5G नेटवर्कच्या चाचणी दरम्यान शेकडो पक्ष्यांचा अचानक मृत्यू झाला. हेग शहरातील 5 जी नेटवर्कच्या चाचणीदरम्यान सुमारे ३०० पक्ष्यांचा मृत्यू झाला होता, त्यापैकी १५० पक्ष्यांचा चाचणी सुरू झाल्यानंतर काही वेळातच मृत्यू झाला होता.याचिकेत म्हटले आहे की, २०१८ मध्ये हरियाणाच्या गुरुग्राममध्ये चीनी कंपनी हुवावेने 5 जी इंटरनेटची चाचणी केली होती. यात असे म्हटले आहे की, 5 जी नेटवर्कच्या तंत्रज्ञानामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा वापर केला जातो, यामुळे कर्करोगाचा धोकादेखील मोठ्या प्रमाणात वाढतो. गर्भधारणेदरम्यान मोबाइल रेडिएशनचा स्त्रिया तसेच मुलांवरही परिणाम होतो. 5 जी नेटवर्क दहशतवाद्यांसाठी उपयुक्त ठरेल आणि देशाच्या सुरक्षेलाही मोठा धोका असल्याचे याचिकेत म्हटले आहे.