दिल्लीच्या गाझीपूर सीमेवर बत्तीगुल, शेतकऱी आंदोलनामध्ये उडाली खळबळ

शेतकरी आंदोलनामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास गाझीपूर सीमेवर बत्तीगुल केल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे.

तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सिंघू सीमेवर शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. शेतकरी आंदोलनामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास गाझीपूर सीमेवर बत्तीगुल केल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास शेतकऱ्यांच्या कॅम्पची वीज पोलिसांनी तोडली. तसेच शेतकऱ्यांनी पोलीस आणि सरकारवर आंदोलन अस्थिर करण्याचा आरोप केला आहे.

राकेश टिकैत यांचा प्रशासनावर गंभीर आरोप

प्रशासनाने आज वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला. लाईट बंद केली. भीतीचे वातावरण पसरविले जात आहे. यामुळे आम्ही रात्रभर जागे राहिलो आहोत. प्रशासनाला आमचे आंदोलन संपवायचे आहे. जेव्हा दिल्ली पोलीस दाखल केलेल्या गुन्ह्यांवर चौकशीला बोलवेल तेव्हा आम्ही त्यांना सामोरे जाऊ. काही शेतकरी संघटनांनी आंदोलन मागे घेतल्यावर टिकैत यांनी सांगितले की, गाझीपूर बॉर्डरवर वीज कापताच ते लोक गायब झाले.

आमचे आंदोलन सुरुच राहिल. लाल किल्ल्यावर जे काही झाले, ज्याने ते केले त्याच्याविरोधात कारवाई व्हावी. जे काही घडले आणि ज्याने घडविले त्याच्यासोबत आम्ही नाही आहोत. ट्रॅक्टर रॅलीचा जो मार्ग दिला होता, त्यावरून पोलिसांनी जाऊ दिले नाही. आम्ही काही चुकीचे केले नाही. दांड्यामध्येच झेंडा अडकवता येतो, त्यामध्ये चुकीचे काय. आंदोलन संपविण्याची सरकारची ही चाल आहे.