PhonePe वापरत असाल तर सावधान ! ;  एक कॉल येईल आणि तुमचे अकाउंट होईल रिकामे

बनावट लिंक किंवा बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या बॅंक खात्याशी निगडीत सर्व माहिती अशा सायबर चोरांपर्यत पोचते. तुमचे बॅंक खाते, इंटरनेट बॅंकिंग क्रेडेन्शियल इत्यादी महत्त्वाची माहिती चोरांपर्यत पोचते. हे सायबर गुन्हेगार तुम्हाला कॉल करतात आणि आपण फोन पे चे कर्मचारी असल्याचे तुम्हाला सांगतात.

    नवी दिल्ली: जर तुम्ही फोनपे (PhonePe)वापरत असाल तर सावधान! कारण सध्या सायबर फ्रॉड मध्ये फोनेपेच्या माध्यमातून पैशांची चोरी केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या फ्रॉडमध्ये तुम्हाला एक कॉल येईल आणि तुमचे बॅंक अकाउंट पूर्ण रिकामे होईल. येणारा कॉलही असा असेल की तुम्हाला थोडासाही संशय येणार नाही. कॉल करणारी व्यक्ती तुम्हाला आपण फोन पे चे कर्मचारी असल्याचे सांगेल आणि नंतर तुमच्या पैशांची चोरी केली जाईल. तुमच्या नकळत तुम्हाला गंडा घातला जाईल. ही कॉल करणारी व्यक्ती तुम्हाला ‘फोन पे’द्वारे कॅशबॅक मिळाल्याचे सांगते. त्यानंतर आपल्याला एका रिवार्डपे बटनावर क्लिक करण्यास सांगितले जाते. तुम्ही या बटनावर क्लिक केल्याबरोबर तुमच्या बॅंक खात्यातील रक्कम गायब होते. हल्ली अशा सायबर चोऱ्यांचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहे. विशेषत: फोन पे (PhonePe UPI)शी जोडलेल्या नंबरांना मोठ्या प्रमाणावर फसवले जाते आहे. महाराष्ट्रातील ठाणे पोलिसांनी यासंदर्भातील अलर्टदेखील दिले आहे.

    पोलिसांकडून सतर्कतेचा इशारा

    पोलिसांनी दिलेल्या माहितीमध्ये काही अशी प्रकरणे समोर आली आहेत ज्यात ग्राहकांनी कॉलवर सांगितल्याप्रमाणे क्लिक केले आणि त्यांच्या बॅंक खात्यातील रक्कम गायब झाली आहेत. तुम्ही अशा बनावट लिंक किंवा बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या बॅंक खात्याशी निगडीत सर्व माहिती अशा सायबर चोरांपर्यत पोचते. तुमचे बॅंक खाते, इंटरनेट बॅंकिंग क्रेडेन्शियल इत्यादी महत्त्वाची माहिती चोरांपर्यत पोचते. हे सायबर गुन्हेगार तुम्हाला कॉल करतात आणि आपण फोन पे चे कर्मचारी असल्याचे तुम्हाला सांगतात. त्यानंतर तुम्हाला कॅशलेस पेमेंटच्या बदल्यात कॅशबॅकची ऑफर दिली जाते. यासाठी तुम्हाला फोन पे चे एक नोटिफिकेशन पाठवले जाते. त्यात एक मेसेज आलेला असतो. त्यानंतर हे सायबर गुन्हेगार तुम्हाला सांगतात की त्या मेसेजला क्लिक करा आणि तुम्हाला कॅशबॅक मिळेल. परंतु प्रत्यक्षात होते मात्र उलटेच. तुम्ही क्लिक केल्याबरोबर तुम्हाला तुमचा बॅलन्स चेक करण्यास सांगितले जाते. तुम्ही तुमचा बॅलन्स चेक करण्यासाठी युपीआय पिन नंबर टाकला की तुमच्या खात्यातील सर्व रक्कम गायब झालेली असते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.