कृषी कायद्याविरोधात २६ मार्चला भारत बंदची घोषणा, आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा

सिंघू सीमेवर काल (बुधवार) संयुक्त किसान मोर्चाची बैठक झाली. या बैठकीत २६ मार्चला भारत बंदची घोषणा करण्यात आली. वाढत्या पेट्रोल-डिझेलचे दर, गॅसचे दर आणि खासगीकरणाच्या विरोधात शेतकरी कामगार संघटनेसोबत १५ मार्चला रेल्वे स्थानकावर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे देखील किसान मोर्चाने सांगितले आहे.

    नवी दिल्ली : तीन कृषी कायद्याविरोधात दिल्लीतील सिंघू सीमेवर शेतकऱ्यांच आक्रमक आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला १०० दिवस पूर्ण झाले असून २६ मार्चला शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिली आहे. तसेच आंदोलनाला चार महिने पूर्ण झाले असून शेतकरी संघटनांकडून चक्का जाम करण्यात येणार आहे.

    सिंघू सीमेवर काल (बुधवार) संयुक्त किसान मोर्चाची बैठक झाली. या बैठकीत २६ मार्चला भारत बंदची घोषणा करण्यात आली. वाढत्या पेट्रोल-डिझेलचे दर, गॅसचे दर आणि खासगीकरणाच्या विरोधात शेतकरी कामगार संघटनेसोबत १५ मार्चला रेल्वे स्थानकावर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे देखील किसान मोर्चाने सांगितले आहे. भारत बंदची वेळ आणि स्वरूप आदी प्रकारच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी वाहतूक संघटनांशी १७ मार्चला बैठक होणार आहे.

    दरम्यान उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर सिंघु सीमेवर पक्की घरे बांधण्यास सुरुवात केली आहे. घरे बांधण्यासाठी वीटांपासून ते बांधकाम कामगार पंजाबमधून बोलवण्यात आले आहे. संयुक्त किसान मोर्चाचे दीप खत्री म्हणाले, दोन मजली घरे देखील बांधण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात झाली होती तेव्हा दिवस नोव्हेंबरचे होते. दिल्लीत कडाक्याची थंडी होती. थंडीचे दिवस कसे तरी शेतकऱ्यांनी प्लास्टिकच्या तंबूमध्ये घालवले. परंतु आता थंडी संपून उन्हाळ्याची चाहूल सुरु झालीय. त्यामुळे मार्च महिन्यातील उन्हामुळे शेतकऱ्यांना त्रास होईल. त्यामुळे सिंघु सीमेवर पक्के घरे बांधण्याची घोषणा शेतकऱ्यांनी केली आहे. जोपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत शेतकरी आंदोलन मागे घेणार नाहीयेत.