भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरण :  वरवरा राव यांना सशर्त अंतरिम जामीन मंजूर

५० हजारांच्या वैयक्तिक जातमुचालक्यावर केवळ सहा महिन्यांसाठी सुटका

    मुंबई : एल्गार परिषद आणि भीमा-कोरेगाव हिंसाचाराप्रकऱणी कारागृहात असलेल्या ८२ वर्षीय आरोपी आणि ज्येष्ठ तेलुगु कवी वरवरा राव यांना मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त अटीसह अंतरिम जामीन मंजूर केला. ५० हजारांच्या वैयक्तिक जामीनावर केवळ सहा महिन्यांसाठी त्यांची सुटका करण्यात आली असून शहरी नक्षलवाद प्रकरणातील पहिला जामीन आहे.

    तळोजा कारागृहात राव यांची प्रकृती खालावली आणि त्यांच्या वैद्यकीय उपचारासाठी पत्नी हेमलता यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तळोजा तुरुंगात योग्य काळजी घेत नसल्याने राव यांची प्रकृती गंभीर बनली आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा नानावटी रुग्णालयात हलवण्याचे निर्देश द्यावेत आणि त्यांची जामिनावर मुक्तता करावी’, अशी याचिका पत्नी हेमलता यांनी अड. इंदिरा जयसिंग यांच्यामार्फत केली होती. त्या याचिकेवर न्या. एस.एस. शिंदे आणि न्या. मनिष पितळे यांच्या खंडपीठासमोर जवळजवळ तीन महिन्यांपासून सुनावणी सुरू होती. सर्व पक्षकारांची बाजू ऐकून घेत खंडपीठाने आपला निकाल राखून ठेवला होता. तो सोमवारी जाहीर केला. राव यांची प्रकृती खालावली असल्याचे त्यांच्या सर्व वैद्यकीय अहवालांमधून समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणात अंतरिम दिलासा देणे आवश्यक आहे. मात्र, त्याचा गैरफायदा घेतला जाऊ नये म्हणून कठोर अटी घालणेही आवश्यक असल्याचे खंडपीठाचे आपल्या निकालात स्पष्ट केले आणि खंडपीठाने राव यांना ५० हजारांच्या वैयक्तिक जामीनावर केवळ सहा महिन्यांसाठी सुटका केली आहे. या कालावधीत त्यांना पासपोर्ट राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) कडे जमा करण्याचे निर्देश देण्यात आले असून त्यांच्या परवानगीविना राहत घर सोडण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच सदर प्रकरणातील साक्षीदारांशी संपर्क साधण्याचाही प्रयत्न करू नये असेही न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले आहे.

    सदर प्रकरणात पहिला जामीन 

    ३१ डिसेंबर २०१७ रोजी पुण्यातील शनिवार वाड्याजवळ एल्गार परिषद पार पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी १ जानेवारी, २०१८ रोजी पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथे हिंसाचार उसळला होता. एल्गार परिषदेतील प्रक्षोभक भाषणांमुळे हा हिंसाचार उसळल्याचा तसेच एल्गार परिषदेला माओवाद्यांकडून अर्थपुरवठा झाला आणि अनेक सामाजिक कार्यकर्ते व विचारवंतांचा माओवाद्यांशी संबंध आहे, असा आरोप करत पोलिसांनी अनेक विचारवंत आणि लेखक, कवी, नागरी हक्क कार्यकर्ते यांना अटक केली. त्यात शोमा सेन आणि प्रसिद्ध कवी वरवरा राव, प्रा. आनंद तेलतुंबडे, गौतम नवलखा आणि वर्नोन गोन्साल्विस यांचाही समावेश होता. त्यापैकी अनेकांनी न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र अद्याप त्या याचिका न्यायप्रविषठ आहेत. त्यामुळे वरवरा राव यांना मिळालेला हा सदर प्रकरणातील पहिला जामीन ठरला आहे.