मोठा खुलासा; सुशांत सिंह राजपूत प्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक होण्याची शक्यता

सुशांत सिंह राजपूत प्रकरणी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार धक्कादायक माहिती समोर आली आहे. अभिनेता सुशांत सिंह याची स्थिती रियाची भेट झाल्यानंतर काही दिवसांनंतर बिघडायला सुरूवात झाली होती असं तपासात सीबीआयला आढळून आलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

नवी दिल्ली : सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरणी सीबीआयचा (CBI) कलम 306 म्हणजेच सुशांतला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्यात आलं का या दिशेनेदेखील तपास सुरू आहे. या प्रकरणी सुशांत सिंह याची स्थिती रियाची भेट झाल्यानंतर काही दिवसांनंतर बिघडायला सुरूवात झाली होती असं तपासात सीबीआयला आढळून आलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. रिया चक्रवर्तीसह तिचं संपूर्ण कुटुंब अंमली पदार्थ सेवन करत होतं. सुशांतच्या संपर्कात आल्यानंतर रियाने सुशांतच्या आजारावर इलाज म्हणून बड्ड (गांजा) असल्याचं सांगून त्याला याची सवय लावली होती.

रिया नेहमी आपल्या घरात शोविकच्या माध्यमातून एवढा अंमली पदार्थांचा साठा ठेवत होती की, सुशांतला याची चणचण भासू नये असं सीबीआयला तपासात आढळून आलं असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. सुशांत अंमली पदार्थांच्या आहारी गेला होता. लॉकडाउन सुरू झाल्यानंतर घरात राहून सुशांतचे अंमली पदार्थांचे सेवन वाढले होते. सुशांतच्या बहिणींना ही गोष्ट कळली तेव्हा त्यांनी सुशांतला रियापासून दूर राहण्याचा सल्लाही दिला होता.

सुशांत रियाशिवाय राहूच शकत नव्हता, सुशांतच्या बहिणी आणि रिया यांच्यात वादावादी झाल्यानंतर रियाने सुशांतला एक पर्याय दिला होता, तू माझ्याशी लग्न कर आणि आपण सोबत राहू, किंवा तू तुझ्या कुटुंबियांकडे निघून जा. यानंतर सुशांतचा आपल्या कुटुंबियांशी संवाद कमी झाला होता. पण सुशांतची सततची अशी परिस्थिती पाहून त्याच्या बहिणींची चिंता वाढतच होती आणि त्या सुशांतशी बोलण्याचा प्रयत्न करत असत.

८ जूनला दिशा सालियन हिच्या मृत्यूची बातमी ऐकून सुशांत खूपच दु:खी झाला होता. जेव्हा रिया सुशांतचे घर सोडून निघून गेली तेव्हा दोघांमध्ये वाद झाला होता. या काळात स्वत: शांत राहण्यासाठी सुशांत जास्त प्रमाणात अंमली पदार्थांचे सेवन करू लागला होता. रिया चक्रवर्ती पत्नीप्रमाणेच सुशांतसोबत वास्तव्यास होती, ती निघून गेल्यानंतरच सुशांतने असा टोकाचा निर्णय घेतला असं सीबीआयच्या आतापर्यंतच्या तपासात स्पष्ट झालं आहे.

वास्तविक, सुशांत त्याच्या बहिणी आणि रिया यांच्यात भांडणात अडकला होता, त्यानंतर त्याने सर्व वाद संपवण्यासाठी स्वत: आत्महत्या केली. सीबीआयला रियाच्या दिल्ली येथील ICICI बँक खात्यात सुशांतला पैसे ट्रान्सफर केल्याचे कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत. तथापि, सुशांत सिंगच्या मृत्यूसंदर्भात योग्य रितीने आणि व्यावसायिक पद्धतीने चौकशी करीत असल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे. सीबीआयच्या तपासासंदर्भात प्रसिद्ध करण्यात आलेले मीडिया रिपोर्ट्स सत्यतेवर आधारित नाहीत कारण सीबीआय आपल्या तपासाचा तपशील शेअर करत नाही.