Bihar Election 2020 Ban on hugs and handshake during election campaign
निवडणूक प्रचारात 'ही गोष्ट' होणार नाही; बिहार सरकारचे फर्मान

कोरोना काळात होत असलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या (Bihar Legislative Assembly election) प्रचारादरम्यान रॅली, सभा व इतर कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या लोकांसाठी बिहार सरकारडून मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत.

पाटना (patna) : कोरोना (corona) काळात होत असलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या (Bihar Legislative Assembly election) प्रचारादरम्यान रॅली, सभा व इतर कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या लोकांसाठी बिहार सरकारडून मार्गदर्शक तत्त्वे (Guidelines) जारी करण्यात आली आहेत. त्यानुसार प्रचारासाठीच्या रॅली, सभांदरम्यान सहभागी होणाऱ्या लोकांना एकमेकांमध्ये सहा फुटांचे अंतर ठेवावे लागेल, प्रत्येकाच्या तोंडावर मास्क असायलाच हवा, तसेच कोणताही नेता दुसऱ्या नेत्यासोबत हस्तांदोलन करु शकत नाही, एकमेकांची गळाभेट घेऊ शकत नाही. (Bihar Election 2020 : Ban on hugs and handshake during election campaign)

बिहारच्या गृह विभागाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार बंद सभागृहात अथवा खुल्या मैदानात होणाऱ्या सभेमध्ये २०० पेक्षा जास्त लोकांना सहभागी होण्याची परवानगी नसेल. या सभांदरम्यान फिजीकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.

सभेचे, रॅलीचे आयोजन करणाऱ्या लोकांनी संबंधित ठिकाणी टिशू पेपर उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. तसेच संबंधित परिसर पूर्णपणे स्वच्छ असायलाच हवा, अशा सूचना गृह विभागाने केल्या आहेत. बिहारच्या २४३ सदस्यीय विधानसभेचा कार्यकाळ २९ नोव्हेंबर रोजी संपणार आहे. तत्पूर्वी बिहारमध्ये नवे सरकार स्थापना होणे अनिवार्य आहे.

बिहार विधानसभेसाठी एकूण तीन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात २८ ऑक्टोबर, दुसऱ्या टप्प्यात ३ नोव्हेंबर आणि तिसऱ्या टप्प्यात ७ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून निवडणुकीचा निकाल १० नोव्हेंबर रोजी लागणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील आरोरा यांनी ही घोषणा केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदारांना मतदान करण्यासाठी एका तासाचा अधिक वेळ देण्यात आलेला आहे.

दरम्यान महाराष्ट्रातील स्थानिक पक्ष अशी ओळख असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष बिहार विधानसभा निवडणुकीत पूर्ण तयारीनिशी उतरणार आहेत. शिवसेना तब्बल ५० जागा लढवणार असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे बिहारच्या निवडणुकीत स्वतः उद्धव ठाकरे शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत.

शिवसेनेकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने २० जणांच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत यांचा समावेश आहे. नुकतीच शिवसेनेनं निवडणूक आयोगाकडे ही यादी सोपवली आहे. शिवसेनेने जाहीर केलेल्या या यादीतील सर्व नेते निवडणुकांच्या प्रचारसभेत सहभागी होणार आहे.

राष्ट्रवादींकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर

दरम्यान ७ ऑक्टोबर राष्ट्रवादीने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली होती. या यादीमध्ये महाराष्ट्रातून स्वत: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार प्रफुल पटेल, खासदार सुनील तटकरे, खासदार सुप्रिया सुळे तसेच अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश आहे.