प्राण्यांना गोमांस देणे बंद करा, अन्यथा…

प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांच्या आहारात अनेक वर्षांपासून गोमांसाचा समावेश असतो. मात्र हा प्रकार बंद करावा, यासाठी भाजपा नेत्यांनी आसाममधील गुवाहाटीत आंदोलन केले.

प्राणीसंग्रहालयातील (Zoo) प्राण्यांना गोमांस (Beef) देणे बंद करावे, या मागणीसाठी आसाममधील (Assam) भाजपा नेते सत्य रंजन बोराह (Satya Ranjan Borah) यांनी सोमवारी आंदोलन केले. गुवाहाटीतील (Guwahati) प्राणीसंग्रहालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. प्राणीसंग्रहालयात गोमांस घेऊन जाणारी गाडी बोराह यांनी 30 कार्यकर्त्यांसह रोखली. प्राण्यांना गोमांस खाऊ घालण्याचा प्रकार तातडीने बंद करा, अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जा, अशा इशारा बोराह यांनी प्राणीसंग्रहालय प्रशासन आणि आसाम राज्य सरकारला (Assam State Government) दिला आहे.

      बोराह यांनी आपल्या मागण्या केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाकडे पाठवाव्यात, अशी प्रतिक्रिया गुवाहाटीतील प्राणीसंग्रहालयाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. संग्रहालयातील प्राण्यांच्या आहाराचे नियम हे केंद्रीय संस्थांकडूनच ठरवले जात असल्याच्या वस्तुस्थितीकडेही त्यांनी बोट दाखवले आहे.