भाजपा,योगींच्या हिंदुत्वाला रोखण्यासाठी ममता, प्रियंका आणि अखिलेश यांची पळापळ, सॉफ्ट हिंदुत्वाकडे विरोधकांचा कल

उत्तर प्रदेशात चार महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांचे बिगूल वाजले असून, सत्ताधारी भाजपा आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात हिंदुत्वाचा राजकीय अजेंडा सेट केला आहे. सोमवारी झालेल्या भाजपाच्या बैठकीत पुढील १०० दिवसांचे प्लॅनिंगही करण्यात आले आहे. दुसरीकडे भाजपाच्या या रणनीतीला काटशह देण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरु झाला आहे.

  लखनौ : उत्तर प्रदेशात चार महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांचे बिगूल वाजले असून, सत्ताधारी भाजपा आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात हिंदुत्वाचा राजकीय अजेंडा सेट केला आहे. सोमवारी झालेल्या भाजपाच्या बैठकीत पुढील १०० दिवसांचे प्लॅनिंगही करण्यात आले आहे. दुसरीकडे भाजपाच्या या रणनीतीला काटशह देण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरु झाला आहे.

  सद्यस्थितीत भाजपाच्या हिंदुत्वाच्या हत्याराची धार बोथट करण्यासाठी सर्वच विरोधी पक्ष सॉफ्ट हिंदुत्वाकडे झुकले असल्याचे समोर येते आहे. दिल्लीत अरविंद केजरीवाल आणि प. बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनीही सॉफ्ट हिंदूत्व अंगिकारले होते, आता उत्तर प्रदेशातही तेच घडताना दिसते आहे.

  प्रियंका गांधींची दुर्गास्तुती

  काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांनी रविवारी वाराणसीत मिशन-२०२२चे रणशिंग फुंकले, त्यासाठी त्या एअरपोर्टवर उतरुन थेट काशी विश्वनाथाच्या मंदिरात पोहोचल्या. तिथे त्यांनी काशी विश्वेशराची षोडोषपचारे पूजाही केली. त्यानंतर दुर्गाकुंड येथे कुष्मांडा देवीच्या दर्शनासाठीही त्या गेल्या. मस्तकार त्रिपुंड, हातात तुळस आणि रुद्राक्षाची माळ, अशा रुपात हाती तलवार घेत दुर्गेच्या रुपात प्रियंका गांधी काशीच्या रॅलीत सगळ्यांना दिसल्या. नवरात्रीत व्रत करत असल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. आपल्या भाषणाची सुरुवातही त्यांनी दुर्गामातेची स्तुती करत ‘जय माता दी’च्या गजराने केली.

  हिंदुत्वाच्या रंगात असलेल्या प्रियंका दिसण्याचा हा काही पहिलाच प्रसंग नव्हता, यापूर्वीही २०१९च्या लोकसभा निवडमुकीत प्रचारात प्रियंका यांनी अनेक मंदिरात जाऊन पूजा-अर्चा केली होती. प्रयागराजमध्ये माघ मेळ्यात त्यांनी त्रिवेणी संगमावर स्थानही केले होते.

  अयोध्या-काशी-मथुरेसाठी मायावतीही मैदानात

  बहुजन समाज पार्टीचे संस्थापक काशीराम यांच्या १५ व्या परिनिर्वाणदिनी मायावतींनी आपल्या निवडणुकीतील मुद्द्यांची व्यासपीठावरुन उजळणी केली, बसपाचे सरकार सत्तेत आले तर अयोध्या, काशी, मथुरा येथील विकासकार्ये थांबवण्यात येणार नाहीत, असे आश्वासनही त्यांनी दिले. उ. प्रदेशात बसपातर्फे ब्राह्मण संमेलने घेण्यात येत आहेत, त्याची सुरुवात अयोध्येतून करण्यात आली. तर पार्टीचे महासचिव संतीशचंद्र मिश्रा यांनी रामलल्लाचे दर्शनही घेतले. लखनौत बसपाच्या ब्राह्मण संमेलनाचा समारोप हिंदुत्वाच्या रंगात पार पडला. शंखध्वनी घुमला, मंत्रोच्चार झाले, हातात त्रिशुळ घेऊन मायावती दुर्गेच्या रुपात पाहायला मिळाल्या. त्यांच्या हातात श्रीगणेशाची प्रतिमाही पाहायला मिळाली. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर स्वार होण्यासाठी मायावतीही सज्ज असल्याचे या सगल्यातून दिसते आहे.

  अखिलेश यादव यांची मंदिर परिक्रमा

  समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव हेही सध्या उ. प्रदेशात मंदिरामंदिरात भेटी देताना दिसत आहेत. ते त्या ठिकाणी पूजार्चाही करतायेत. राममंदिराचे निर्माणकार्य पूर्ण झाल्यावर सहकुटुंब रामलल्लाचे दर्शन घेणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे. इटाव्यात अखिलेश यांनी ५१ फुटी श्रीकृष्णाची मूर्तीही स्थापन केली आहे.

  सॉफ्ट हिंदुत्वाकडे विरोधकांचा कल

  हिंदुत्वावर स्वार होत भाजपा सर्व विरोधकांना मागे टाकत पुढे निघून गेलाय. त्यानंतर विरोधकांच्या हे लक्षात आले आहे की ध्रुवीकरणाच्या राजकारणाचा फट
  का सहन कराययचा नसेल, तर मुस्लीम समर्थक अशी पक्षाची प्रतिमा बदलणे गरजेचे आहे. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत अयोध्या, काशी, मथुरा हे तिन्ही प्रचाराचे मुद्दे राहणार आहेत, त्यात भाजपाकडून अयोध्येवर जास्त भर दिला जाण्याची शक्यता आहे. यामुळेच अयोध्या सर्व पक्षांच्या राजकीय अजेंड्यावर आहे.
  काँग्रेसने यापूर्वी मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानच्या निवडणुकीत सॉफ्ट हिंदुत्वाच्या जोरावर सत्ता मिळवण्यात यश मिळवलं आहे. आता राहुल गांधी यांच्यानंतर प्रियंका गांधीही सॉप्ट हिंदुत्वाच्या वाटेवर चालून राजकारणात आपले स्थान मजबूत करण्याच्या प्रयत्नात दिसत आहेत.

  ममता- केजरीवाल यांच्या यशाने आत्मविश्वास वाढला

  नुकत्याच पार पडलेल्या प. बागल निवडणुकीत जय श्रीरामचा नारा देत, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपाने सर्व जोर लावला होता. याला प्रत्युत्तर देताना ममता बॅनर्जी या दुर्गेच्या मंडपात दिसू लागल्या. व्यासपीठावरुन दुर्गास्तुतीचे पाठ हा प्रचाराचा महत्त्वाचा भाग ठरला. दीदींच्या घरातील पूजेचे फोटोही व्हायरल झाले. ममता यांचा हा विजयी फॉर्म्युलाच आता विरोधक अजमावताना दिसतायेत. तर त्याआधी झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकांतही भाजपाच्या रामाच्या नावाच्या राजकारणाला शह देण्यासाठी केजरीवाल यांनी हनुमान मंदिरांचा आश्रय घेतला. एकूणच मतदारांच्या मनातील श्रद्धा हा विषय आता राजकारणात महत्त्वाचा झाला आहे. २०१४ च्या निवडणुकांनंतर आता देशातील राजकारण हे बहुसंख्याकांचे राजकारण होऊ पाहते आहे. त्यामुळेच भाजपाचे हिंदूत्व आणि विरोधकांचे सॉफ्ट हिंदूत्व हे मुद्दे निवडणुकांत विजय-पराभव ठरवणार आहेत.