केरळात भाजपाला झटका ; थॉमस यांची एनडीएला सोडचिठ्ठी

निवडणुकीत तिकिट मिळविण्यासाठी दावेदार सर्व मर्यादाही पार करतात. यासाठी ते नेत्यांचे पाय झिजविण्यासह लाच देण्यापर्यंतही त्यांची मजल जाते परंतु केरळात एमबीए उत्तीर्ण युवकाने मात्र भाजपाने दिलेली उमेदवारी नाकारल्याने खळबळ उडाली आहे.

    तिरुवनंतपूरम : केरळात विधानसभा निवडणुकांपूर्वी भाजपाला जबर झटका बसला आहे. कांग्रेस सोडून भाजपात सहभागी झालेले पी.सी. थॉमस यांनी आता एनडीएलाही सोडचिठ्ठी दिली आहे. केरळ काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या थॉमस यांच्या नेतृत्वातील गटाने आगामी विधानसभा निवडणुकीत एकही जागा न मिळाल्यामुळे मंगळवारी उशिरा रात्री एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. गेल्या विधानसभा निवडणुकीत थॉमस यांच्या गटाने चार जागा लढविल्या होत्या परंतु यंदा भाजपाने एकही जागा दिली नाही.

    वाजपेयी मंत्रि मंडळात होते राज्यमंत्री

    थॉमस अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये २००३ ते २००४ पर्यंत कायदा आणि न्याय व्यवस्था विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री होते. केरळातील मुवत्तुपुझा लोकसभा मतदारसंघाचे त्यांनी प्रतिनिधित्वही केले आहे. २००४ मध्ये एनडीएला केरळात आपले पहिले खाते उघडण्यास थॉमस यांनीच मदत केली होती. गेल्या पाच निवडणुकीत थॉमस काँग्रेसच्या नेतृत्वातील युडीपीएफच्या सहकाऱ्यांनी केरळ काँग्रेसचे (मणी) उमेदवार होते. तथापि मे २००१ च्या विधानसभा निवडणुकीनंतर थॉमस यांनी राजकीय संरक्षक राज्याचे महसूल मंत्री के. एम. मणी यांचा हात सोडला होता.

    भाजपाची उमेदवारी एमबीए युवकाने नाकारली

    निवडणुकीत तिकिट मिळविण्यासाठी दावेदार सर्व मर्यादाही पार करतात. यासाठी ते नेत्यांचे पाय झिजविण्यासह लाच देण्यापर्यंतही त्यांची मजल जाते परंतु केरळात एमबीए उत्तीर्ण युवकाने मात्र भाजपाने दिलेली उमेदवारी नाकारल्याने खळबळ उडाली आहे. वायनाड जिल्ह्यातील मानवंतवाडी मतदारसंघातील ही घटना आहे. हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. भाजपाने पनिया जातीतील सुशिक्षित युवक मनीकुट्टनला उमेदवारी दिली होती. रविवारी जाहीर झालेल्या उमेदवार यादीत त्याचे नावही होते. दूरचित्रवाणीवर त्याचे नाव झळकताच त्याने तत्काळ नेत्यांना फोन लावला आणि निवडणूक न लढविण्याचा निर्णय कळविला. सामान्य नागरिक म्हणूनच देशाची सेवा करण्याची इच्छा असल्याचे त्याने भाजपा नेत्यांना कळविले.