भाजपा – ओलींमध्ये शिजतेय् कोणती खिचडी?

मागील काही महिन्यांपासून नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्याकडून सातत्याने भारताविरोधात वक्तव्ये येत होती. त्यानंतर भारताने हालचाली करून नेपाळला आपल्या बाजूने वळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे या भेटीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. द्विपक्षीय संबंधावर चर्चा

काठमांडू: नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांची भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि भाजपाच्या परराष्ट्र विभागाचे प्रमुख विजय चौथाईवाले यांनी भेट घेतली आहे. या भेटीत सध्या राजकीय परिस्थितीतीबाबत आणि दोन्ही देशांतील संबंधाबाबत चर्चा झाल्याचे समजते. मागील महिन्यात भारतीय परराष्ट्र सचिव आणि लष्करप्रमुख जनरल एम. एस. नरवणे यांनी नेपाळ दौरा केल्यानंतर भाजपाच्या ज्येष्ठ नेत्याने ओलींची भेट घेतली आहे. यामुळे राजकीय तर्कवितर्क लढविले जात असून भाजपा आणि नेपाळी पंतप्रधानांमध्ये कोणती खिचडी शिजतेय् यावरुन चर्चांना उधाण आले आहे.

चौथाईवाले यांनी सांगितले की, नेपाळ कम्युनिस्ट पक्षाचे नेते आणि अर्थमंत्री विष्णू पौडेल यांच्या आमंत्रणावरून नेपाळ दौरा केला. नेपाळच्या पंतप्रधानांसोबत भेट झाली असल्याचे त्यांनी ट्विटद्वारे सांगितले. त्यांनी या भेटीचा एक फोटोही पोस्ट केला आहे. दरम्यान, मागील काही महिन्यांपासून नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्याकडून सातत्याने भारताविरोधात वक्तव्ये येत होती. त्यानंतर भारताने हालचाली करून नेपाळला आपल्या बाजूने वळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे या भेटीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
द्विपक्षीय संबंधावर चर्चा

या भेटीमध्ये भारत आणि नेपाळमधील संबंधावर आणि नेपाळमधील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले. नेपाळमध्ये सध्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षातील गटबाजी वाढली आहे. एक गट ओली यांच्यासोबत असून दुसरा गट पुष्प कमल दहल ‘प्रचंड’ यांच्यासोबत आहे.

अन्य भारतीय अधिकाऱ्यांचा नेपाळ दौरा

याआधी भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी देखील नेपाळ दौरा केला होता आणि त्यांनी नेपाळच्या पंतप्रधानांसोबत चर्चा केली होती. नोव्हेंबरमध्ये भारतीय लष्करप्रमुख जनरल एम.एम. नरवणेदेखील आले होते. भारतीय गुप्तचर संस्था ‘रॉ’ चे प्रमुख सामंत कुमार गोयल यांनीदेखील ऑक्टोबरमध्ये नेपाळ दौरा केला होता.
कोण आहेत विजय चौथाईवाले?

विजय चौथाईवाले भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्याशिवाय पक्षाच्या परराष्ट्र संबंधाबाबतच्या विभागाचे प्रमुख आहेत. त्यांच्या देखरेखीतच २०१९ मध्ये अमेरिकेच्या ह्युस्टनमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या हाउडी मोदी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यात चौथाईवाले यांचा मोठा वाटा होता. विजय चौथाईवाले हे शास्त्रज्ञ असून भाजपात सामिल होण्याआधी ते टोरंट कंपनीसाठी काम करत होते. वर्ष २०१४ मध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला होता आणि त्यानंतर ते पक्षा सक्रिय आहेत.