cabinet Expansion

मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion)करताना २० नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रातील भाजपाचे नेते नारायण राणे(Narayan Rane) यांच्यासह अनेक नेत्यांना दिल्लीत बोलावून घेण्यात आलं आहे.

  दिल्लीः केंद्रीय मंत्रिमंडळात(Cabinet Expansion) मोठे फेरबदल केले जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. आता मंत्रिमंडळ विस्ताराचंही काउंटडाउन सुरू झाल्याचं बोललं जात असून, केंद्र सरकार आणि सत्ताधारी भाजपाकडून वेगाने राजकीय हालचाली केल्या जात आहेत.

  मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion)करताना २० नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रातील भाजपाचे नेते नारायण राणे यांच्यासह अनेक नेत्यांना दिल्लीत बोलावून घेण्यात आलं आहे.मंत्रिमंडळ विस्ताराच्या तोंडावरच केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावर चंद गेहलोत यांची कर्नाटकाच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे थावर चंद यांच्याबरोबर इतर काही मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याची शक्यता आहे.

  पुढील वर्षी पाच राज्यात होत असलेल्या निवडणुका लक्षात घेऊन केंद्रात मोठे फेरबदल केले जात आहे. सरकारला दोन वर्ष पूर्ण झाल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार असून, यात काही राज्यांवर विशेष लक्ष दिलं जाणार आहे. यासंदर्भात गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजपातील वरिष्ठ नेते आणि वरिष्ठ मंत्र्यांसोबत चर्चा सुरू आहे. दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारात २० नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याचं वृत्त असून, यात काही नावं स्पर्धेत आहेत.

  मंत्रिमंडळ विस्तार करताना केंद्र सरकार आणि भाजपाकडून उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल आणि इतर निवडणुका असलेल्या राज्यांवर लक्ष्य केंद्रीत केलं जाणार आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेत अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली. ज्यामुळे मोदी सरकारच्या प्रतिमेवरही परिणाम झाला. यातच लोकसभेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या आणि पुढच्या विधानसभा निवडणूक असलेल्या उत्तर प्रदेशातही बिकट अवस्था बघायला मिळाली. त्यामुळे सरकारकडून मोठे फेरबदल करून प्रादेशिक, जातीय आणि राजकीय समीकरण साधण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचं बोललं जात आहे.

  मधल्या काळामध्ये काही मंत्र्यांचं निधन झालं, तर शिवसेना आणि शिरोमणी अकाली दलासह काही पक्ष एनडीएतून बाहेर पडले. त्यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या पक्षातील मंत्र्यांनाही राजीनामे द्यावे लागले. त्यामुळे सर्वच मंत्रीपदावर आता नव्या चेहऱ्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

  ज्योतिरादित्य शिंदे, सर्वानंद सोनोवाल, नारायण राणे, शांतनु ठाकूर, पशुपती पारस, सुशील मोदी, राजीव रंजन, संतोष कुशवाह, अनुप्रिया पटेल, वरुण गांधी, प्रविण निषाद यांची नाव चर्चेत आहेत. महाराष्ट्रातून नारायण राणे यांच्याबरोबरच हिना गावित, रणजितसिंह निंबाळकर आणि प्रीतम मुंडे यांच्या नावाचीही चर्चा आहे.