सीबीएसई बोर्डाकडून महत्त्वाची घोषणा, २० जुलैला दहावीचा निकाल होणार जाहीर

दहावीच्या बोर्डाच्या परिक्षेचा निकाल(Tenth Exam Result On 20th July) २० जुलैला जाहीर करणार असल्याची घोषणा सीबीएसई बोर्डाने(CBSE Board Exam) केली आहे.

    इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परिक्षेचा निकाल(Tenth Exam Result On 20th July) २० जुलैला जाहीर करणार असल्याची घोषणा सीबीएसई बोर्डाने(CBSE Board Exam) केली आहे.तसेच बारावीच्या परिक्षेचा निकाल ३१ जुलै रोजी लागणार आहे. आजच सीबीएसईने बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासाठीचे सूत्र जाहीर केले आहे. या सूत्रानुसार, बारावीच्या विद्यार्थ्यांना गुण दिले जाणार आहेत.


    सीबीएसई बोर्डाचे संयम भारद्वाज म्हणाले की, दहावीचा निकाल २० जुलैला आणि बारावीचा निकाल ३१ जुलैला लावण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. जेणेकरुन ज्या विद्यार्थ्यांना परदेशात शिकण्यासाठी जायचं आहे, त्यांना काही अडचणी यायला नकोत. पुढे त्यांनी बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबद्दलही माहिती दिली.

    CBSE बोर्डाने आजच बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचा फॉर्म्युला सर्वोच्च न्यायालयापुढे सादर केला. ४०: ३०: ३० या फॉर्म्युल्यानुसार आता बारावीच्या विद्यार्थ्यांचं मूल्यमापन होणार आहे.

    मूल्यमापनाच्या या पद्धतीनुसार, यासाठी तीन प्रकारचे गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. इयत्ता दहावीमध्ये विद्यार्थ्यांच्या कामगिरीवर ३० टक्के मार्क देण्यात येणार आहेत. त्यामध्ये सर्वोत्कृष्ट गुण असलेल्या तीन विषयांचा समावेश करण्यात येईल. त्यानंतर ३० टक्के गुण असतील ते ११ वीच्या अंतिम परिक्षेत केलेल्या कामगिरीवर आधारित आणि उरलेले ४० टक्के गुण हे बारावी इयत्तेत घेतलेल्या चाचणी परीक्षा, सत्र परीक्षा आणि पूर्व परीक्षा यांच्या गुणांच्या आधारावर देण्यात येतील.