वायुसेनेला मिळणार ८३ तेजस विमाने, केंद्र सरकारने ४८ हजार कोटींच्या सौद्याला दिली मंजुरी

लढाऊ विमान तेजसची ४८ हजार कोटींच्या सौद्याला कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS)ची मंजुरी मिळाली आहे. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली CCS ने या सौद्याला मंजुरी दिली आहे.

भारतीय वायुदलाच्या ताफ्यात ८३ तेजस विमानांचा समावेश होणार आहे. सौदा ठरल्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी याबाबत माहिती दिली. भारतीय वायुदल अधिक शक्तीशाली होण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे असंही सिंह म्हणाले, हा सौदा संरक्षण क्षेत्रात गेमचेंजर ठरणार असल्याचेही सिंह यांनी स्पष्ट केले.

तेजस हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर क्षेपणास्त्रांचा मारा करू शकते. यात अँटीशिप क्षेपणास्त्र, बॉम्ब आणि रॉकेटही लावण्याची क्षमता आहे. तेजस ४२% कार्बन फायबर, ४३%ॲल्यिमिनियम एलॉय आणि टायटेनियम पासून तयार करण्यात आले आहे. तेजस स्वदेशी चौथ्या पिढीचे टेललेस कंपाउंड डेल्टा विंग विमान आहे. हे चौथ्या पिढीचे सुपरसोनिक लढाऊ विमानांच्या समूहातील सर्वात हलके आणि सर्वात छोटे विमान आहे. हलके लढाऊ विमान (LCA) तेजसला भारतीय वायुदलाद्वारे पश्चिमी सीमेवर पाकिस्तान सीमेजवळ तैनात करण्यात आले आहे.

तेजसच्या सौद्याबाबत राजनाथ सिंह म्हणाले हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) ने याआधीच आपल्या नाशिक आणि बेंगळुरु विभागात दुसऱ्या फळीतील पुर्ननिर्माणाच्या सुविधा दिल्या आहेत. HAL एलसीए-एमके 1 ए उत्पादन भारतीय वायुदलाला देणार आहे. आज घेतलेल्या निर्णयामुळे आता असलेल्या एलसीए तंत्राचा अधिक विस्तार होईल आणि यामुळे नोकरीच्या नव्या संधी निर्माण होण्यासही मदत होईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली CCS ने ऐतिहासिक दृष्ट्या सर्वात मोठ्या स्वदेशी संरक्षण सौद्यावर शिक्कामोर्तब केले आहे. हा सौदा ४८ हजार कोटी रुपयांचा आहे. यामुळे आपल्या वायुदलाच्या ताफ्याची क्षमता स्वदेशी ‘LCA तेजस’च्या माध्यातून अधिक शक्तीशाली होणार आहे. भारताच्या संरक्षण उत्पादनांसाठी हा सौदा गेमचेंजर ठरणार असल्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले.

आपली क्षमता वाढविण्यावर भारताने केंद्रित केले लक्ष्य

चीन आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेला तणाव पाहता भारताने संरक्षण क्षेत्रात आपली क्षमता वाढविण्यासाठी अलीकडेच काही निर्णय घेतले आहेत. काही दिवसांपूर्वीच कॅलिबर बंदुकाबाबत अमेरिका आणि भारत यांच्यात करार झाला. अमेरिकेने भारतीय नौदलाच्या युद्धनौकांवर तात्काळ कॅलिबर बंदुका देण्यास सहमती दर्शवली आहे. १२७ मिमी मध्यम आकाराच्या कॅलिबर बंदुका अमेरिकेच्या बीएई सिस्टमद्वारे निर्मिती करण्यात येते. हा सौदा ६०० मिलियन अमेरिकन डॉलर्सचा असणार आहे. भारतीय नौदलाला पहिला तीन बंदुका अमेरिकेच्या नौदलाकडे असलेल्या ताफ्यातून देण्याची मागणी भारताने केली आहे, ज्यामुळे भारतीय नौदलांच्या युद्धनौकांवर यांचा लगेचच समावेश करणे शक्य होणार आहे.