केंद्र सरकारकडून रंगीत टीव्हीच्या आयातीवर बंदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याआधी व्होकल फॉर लोकलचे आवाहन समस्त देशवासियांना उद्देशून केले होते. त्यानंतर आता आत्मनिर्भर भारत योजनेला चालना दिली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारने देशामध्ये रंगीत टीव्हीच्या आयातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.परदेश व्यापार महासंचालनालयाने या संदर्भात पत्रक काढले आहे. रंगीत टीव्ही आयातीसाठी धोरणात बदल केल्याचे या पत्रकाद्वारे समोर आले आहे.तसेच याची श्रेणी मुक्त न ठेवता प्रतिबंधित अशी करण्यात आली आहे.

 सरकारने याआधी देशी वस्तूंचे उत्पादन वाढवण्यासाठी अनेक गोष्टी केल्या आहेत. तसेच कमी आवश्यकतेच्या वस्तूंच्या आयातीत कपातीसाठी निर्णय घेतले आहेत.रंगीत टीव्हीबाबत सांगायचे झाले तर भारतात चीन, व्हिएतनाम, हाँगकाँग, मलेशिया, इंडोनेशिया, कोरिया, जर्मनी, थायलंड इत्यादी देशांकडून रंगीत टीव्ही आयात केले जायचे. मात्र आता यावर बंदी घालण्यात आली आहे.  ही बंदी १४ इंचाच्या टीव्हीपासून ४१ इंचाच्या टीव्हीसाठीही लागू असेल. अन्य एका पत्रकात सरकारने २४ इंचापेक्षा कमी लिक्वीड क्रिस्टल डिस्प्ले टीव्हीलाही बंदी घातली आहे. 

आयातीच्या धोरणांमधील बदलामुळे कुणाला जर बंदी घातलेली वस्तू मागवायची असेल तर सरकारची परवानगी मागावी लागणार आहे.