प्रवासी आणि माल वाहतुकीवरील बंदी हटवण्याचे केंद्राचे राज्यांना आदेश

केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी राज्यांना निर्देश देणारे एक पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये त्यांनी राज्यातील आणि राज्याराज्यातील प्रवासी आणि मालवाहतूक सुरु करण्याविषयी लिहिले आहे.

या पत्रामध्ये भल्ला यांनी असे म्हटले आहे की, केंद्र सरकारने अनलॉक -३ जी नियमावली जाहीर केली आहे. त्याचे उल्लंघन करण्यात आले आहे. राज्यांतर्गत आणि दोन राज्यांमधील वाहतुकीवर कोणतेही बंधन ठेवायला नको. राज्यांमध्ये स्थानिक पातळीवर प्रवासी वाहतुकीवरील बंधनांचा परिणाम राष्ट्रीय स्तरावरच्या माल पुरवठा साखळीवर झाला आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहारांवरही परिणाम झाला आहे. या कारणांमुळे बेरोजगारी वाढली आहे.

‘अनलॉक-३’ च्या नियमावलीचा संदर्भ देत भल्ला यांनी असे म्हटले की,‘अनलॉक -३’ नियमावलीत पाचव्या परिच्छेदात म्हटले आहे की, प्रवासी आणि माल वाहतूकीवर कोणतेही बंधन नसेल. तसेच शेजारील भागात करारानुसार सीमापार व्यापार करण्यासाठी स्वतंत्र परवानगी आणि ई – परमिटची गरज नाही.

जिल्हा प्रशासनासकट विविध पातळ्यांवर हालचालीवर निर्बंध असल्याचा अहवाल केंद्राकडे आला आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये वाहतुकीवर बंधने घालण्यात आल्याने वस्तू आणि मालाच्या पुरवठा साखळीवर खूप परिणाम होत असल्याचे भल्ला यांनी म्हटले आहे.