केंद्रीय मंत्रीमंडळाचा मोठा निर्णय,१ एप्रिलपासून ४५ पेक्षा जास्त वय असणाऱ्यांना मिळणार कोरोनावरील लस – जावडेकरांनी केली घोषणा

कोरोना लसीकरणाचा चौथा टप्पा(corona vaccination fourth phase) १ एप्रिलपासून सुरु होत आहे. या चौथ्या टप्प्यामध्ये केंद्रीय मंत्रीमंडळाने ४५ वर्षांपेक्षा (corona vaccination to people above 45 years)अधिक वय असणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी परवानगी दिली असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर(prakash javadekar) यांनी दिली आहे.

    दिल्ली :  केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज महत्त्वाची घोषणा केली आहे.केंद्रीय मंत्रीमंडळाने ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी परवानगी दिली आहे. प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, १ एप्रिलपासून ४५ वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या लोकांना कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. ज्या व्यक्तींचे वय ४५ पेक्षा जास्त आहे अशा व्यक्तींनी कोरोना लसीसाठी नोंदणी करावी. तसेच लस घ्यावी असे आवाहन प्रकाश जावडेकर यांनी केले आहे.

    लसीकरणाचा चौथा टप्पा १ एप्रिलपासून सुरु होत आहे. या चौथ्या टप्प्यामध्ये ४५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या सर्व नागरिकांचे लसीकरण होणार आहे. कोरोनाच्या लसीची देशामध्ये कमतरता नाही. भारतातील दोन्ही लसी परिणामकारक आहेत, असे जावडेकरांनी स्पष्ट केले.

    पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षेखाली मंत्रीमंडळाची बैठक झाली. या बैठकीमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली. भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोना प्रतिबंधक लसींचे लसीकरण केलं जात आहे. आतापर्यंत ४ कोटी ८५ लाख लोकांना कोरोनाचे डोस देण्यात आले आहेत, असं जावडेकरांनी या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं.

    तसेच गेल्या २४ तासांमध्ये विक्रमी ३२ लाख ५४ हजार जणांना कोरोनाचे डोस देण्यात आले असल्याचंही जावडेकर यांनी  स्पष्ट केलं. फेब्रुवारीमध्ये दिवसाला ३ लाख ७७ हजार करोनाचे डोस दिले जायचे. मार्च महिन्यात ही दैनंदिन आकडेवारी १५ लाख ५४ हजारांपर्यंत गेली आहे, असंही जावडेकरांनी स्पष्ट केलं. मागील आठवड्यामध्ये (१४ ते २० मार्च दरम्यान) दिवसाला करोना लसींचे २० लाख डोस देण्यात आल्याची माहितीही जावडेकरांनी दिली.

    जावडेकर पुढे म्हणाले की, पहिल्या टप्प्यामध्ये आरोग्य सेवा आणि करोना योद्ध्यांचे लसीकरण करण्यात आलं. त्यानंतर १६ फेब्रुवारीपासून ६० वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्यांचं लसीकरण सुरु झालं. एक एप्रिलपासून ४५ हून अधिक वय असणाऱ्या आणि इतर व्याधी असणाऱ्यांचं लसीकरण करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती.

    आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या सर्व नागरिकांना करोनाची लस उपलब्ध होईल, हा निर्णय घेण्यात आला. तसेच दोन डोसदरम्यान चार किंवा सहा आठवड्यांचा वेळ असावा असा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र आता कोविशिल्डचा डोस चार ते आठ आठवड्यांच्यादरम्यान घेणं योग्य ठरेल असं संशोधकांना दिसून आलं आहे. त्यामुळे ही सवलतही देण्यात आल्याचे जावडेकर म्हणाले.