‘मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी शेतकऱ्यांची माफी मागीतली पाहिजे’ मेघालयच्या राज्यपालांची प्रतिक्रिया

“जे काही घडलं ते अत्यंत निंदनीय आहे. जर हे प्रकरण वाढले तर एसडीएमचं डोकं देखील फुटू शकतं. इतकच नाही तर त्याच्या वरील लोकांची डोकी देखील फुटू शकतात."

    मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी कर्नालमधील शेतकऱ्यांवरील लाठीचार्ज प्रकरणावरुन मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एवढंच नाहीतर त्यांनी लाठीचार्जचे आदेश देणाऱ्या उप जिल्हाधीकाऱ्याला त्वरित बडतर्फ करण्याची मागणी देखील केली आहे.

    NDTV या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मलिक म्हणाले की, “उप जिल्हाधीकारी आयुष सिन्हा पदावर राहण्याच्या योग्यतेचे नाहीत. त्याला तत्काळ बडतर्फ केले पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी त्याला संरक्षण दिलं आहे आणि हे सर्व काही त्यांच्या सांगण्यावरून घडलं आहे.”

    “मी केंद्र सरकारला शेतकऱ्यांविरुद्ध बळाचा वापर करू नये असे सांगितले होते. केंद्राकडून बळाचा उपयोग झाला नाही, पण मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरुन शेतकऱ्यांना मारहाण होत आहे.”

    यावेळी पत्रकारांनी त्यांना ‘तुम्ही थेट टीका करत आहात तुम्हाला कारवाइची भिती वाटत नाही का?’ असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, “मला या पदाचा मोह नाही. मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे, त्यामुळे मी माझ्या लोकांसाठी बोलत राहीन, परिणाम काहीही असो, मला पर्वा नाही.”

    मलिक म्हणाले की, “जे काही घडलं ते अत्यंत निंदनीय आहे. जर हे प्रकरण वाढले तर एसडीएमचं डोकं देखील फुटू शकतं. इतकच नाही तर त्याच्या वरील लोकांची डोकी देखील फुटू शकतात. हे स्पष्ट आहे की मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार सर्व काही घडत आहे. एसडीएम वरिष्ठांच्या संमतीशिवाय असा आदेश देऊ शकत नाही. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी.”