children infected with corona

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत(Corona Second Wave) कोरोना रुग्णांमध्ये १० वर्षांखालील मुलांचं प्रमाण (Corona Spread To Children) मार्चपासून वाढत आहे.

    एका आकडेवारीनुसार, देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत(Corona Second Wave) कोरोना रुग्णांमध्ये १० वर्षांखालील मुलांचं प्रमाण (Corona Spread To Children) मार्चपासून वाढत आहे. आकडेवारीनुसार, कोरोनाच्या एकूण सक्रिय प्रकरणांमध्ये(Corona Patients) १ ते १० वर्षे वयोगटातील मुलांचं प्रमाण यावर्षी मार्चमध्ये २.८० टक्क्यांवरून ऑगस्टमध्ये ७.०४ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. याचाच अर्थ प्रत्येक १०० सक्रिय कोरोना प्रकरणांपैकी सुमारे सात लहान मुले आहेत.

    तज्ज्ञांच्या मते, १ ते १० वर्षे वयोगटातील कोरोनाची वाढती प्रकरणं हा प्रौढांमधील कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याचा परिणाम असू शकतो. आरोग्य आयोग आणि कुटुंब कल्याण मंत्रालयासह विविध मंत्रालयांचे अधिकारी उपस्थित असलेल्या नीती आयोगाचे सदस्य व्हीके पॉल यांच्या अध्यक्षतेखाली ईजी-१ च्या बैठकीत एक डेटा सादर करण्यात आला आहे. या आकडेवारीनुसार जून २०२० ते फेब्रुवारी २०२१ या नऊ महिन्यांत १ ते १० वयोगटातील मुलं एकूण सक्रिय प्रकरणांमध्ये २.७२ टक्के ते ३.५९ टक्के या श्रेणीत होती.

    एम्पॉवर्ड ग्रुप -१ (EG-1) चा हा अहवाल अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण ठरतो. अनेक तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की, देशात कोरोनाची तिसरी लाट ही अपरिहार्य आहे. या लाटेत लहान मुलांना अधिक संसर्ग होण्याची भीतीदेखील वर्तवण्यात आली आहे. लहान मुलांमधील करोनाच्या वाढत्या घटनांबाबत कोणताही विशिष्ट कारण दिलं गेलं नसलं तरीही, “मोठ्या प्रमाणात व्हायरसच्या संपर्कात आल्याने आणि अधिक चाचण्यांमुळे” आकड्यात ही वाढ झालेली असू शकते असं म्हटलं जात आहे.

    “रुग्णालयात दाखल होणाऱ्या मुलांचं प्रमाण पूर्वीपेक्षा जास्त आहे. हे प्रामुख्याने दोन कारणांमुळे आहे. पहिलं म्हणजे मोठी जागरूकता आणि सतर्कता आहे. दुसरं म्हणजे असुरक्षितता देखील वाढली असावी”, असं सूत्रांचं म्हणणं आहे. सेरो सर्वेक्षणात तर लहान मुलांमध्ये करोना पॉझिटिव्हिटीचं प्रमाण ५७ ते ५८ टक्के आहे.

    “एकूणच मुलांमध्ये कोरोना प्रकरणांचं वाढतं प्रमाण लक्षात घेता आपण याबाबत अधिक जागरूक रहाण्याची गरज आहे. मुलांमध्ये रोगाची तीव्रता प्रौढांच्या तुलनेत निश्चितच सौम्य आहे. मात्र, असं असलं तरीही लहान मुलांना कोरोना संसर्गाचा मोठा धोका निर्माण झाला आहे असं म्हणण्याइतकी परिस्थिती आता निर्माण झालेली नाही. त्याचप्रमाणे, अशी गंभीर परिस्थिती निर्माण होईल असं वाटत देखील नाही”, असं सूत्रांचं म्हणणं आहे. लहान मुलांमध्ये कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण कमी असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, “रुग्णालयात दाखल होणाऱ्या मुलांचं प्रमाण किरकोळ वाढलं आहे. परंतु, केरळमधून घेतलेल्या धड्यानंतर मृत्यूचं प्रमाण पूर्वीपेक्षा स्थिर किंवा कमी झालं आहे.