उत्तर प्रदेश पोलिसांनी प्रियंका गांधींना घेतलं ताब्यात, हात मुरगळत कपडेही ओढल्याचा काँग्रेसचा आरोप

याआधी देखील हाथरस बलात्कार प्रकरणावेळी जेव्हा प्रियंका गांधी या पीडितेच्या कुटुंबीयांना भेटायला जात असताना उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना रोखलं होतं. त्यावेळी उत्तर प्रदेश पोलिसांच्या एका पोलिस कर्मचाऱ्याने प्रियंका गांधी यांची कॉलर पकडली होती.

    उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे रविवारी शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारात आठ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 4 शेतकरी, 3 भाजप कार्यकर्ते आणि 1 भाजप नेत्याच्या ड्रायव्हरचा समावेश आहे. दरम्यान, लखीमपूर खेरी प्रकरणाबाबत उत्तर प्रदेशचे राजकारण तापले असून विविध पक्षांचे नेते लखीमपूर खेरीमध्ये येण्याचा प्रयत्न करत आहेत. यूपी पोलिसांनी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांना ताब्यात घेतले आहे.

    प्रियंका गांधी लखीमपूर खेरीला जात असताना उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांचा हात धरत धक्काबुक्की केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. मात्र, आज पहाटे साडेपाचच्या सुमारास प्रियंका गांधी यांना हरगाव परिसरात पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उत्तर प्रदेश काँग्रेसने प्रियंका गांधींचे कपडे ओढले आणि त्यांचा हात पोलिसांनी मुरडल्याचा आरोप केला आहे. आपला लढा सुरूच ठेवणार असल्याचे पक्षाने म्हटले आहे.

    प्रियंका गांधी काल रात्री लखनऊहून लखीमपूर खेरीला रवाना झाल्या. प्रियंका गांधी वाड्रा यांचा ताफा पोलिसांना चकमा देऊन लखीमपूर खेरीकडे निघाला होता. नंतर पोलिसांनी त्यांना सीतापूरमधील हरगाव येथून ताब्यात घेतले आणि त्यांना पोलीस लाईनमध्ये नेण्यात आले. यासोबतच काँग्रेस नेते दीपेंद्र हुड्डा यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

    दरम्यान, याआधी देखील हाथरस बलात्कार प्रकरणावेळी जेव्हा प्रियंका गांधी या पीडितेच्या कुटुंबीयांना भेटायला जात असताना उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना रोखलं होतं. त्यावेळी उत्तर प्रदेश पोलिसांच्या एका पोलिस कर्मचाऱ्याने प्रियंका गांधी यांची कॉलर पकडली होती.