कोरोनामुळे मृत्यूचे थैमान अन् अंत्यसंस्कारांसाठी लांबच लांब रांग,  मोदी सरकारला आयुष्यभर या घटना आणि फोटो छळत राहतील – सुरजेवालांची टीका

स्मशनाभूमीतही मृतदेह जाळण्यासाठी रांगाच रांगा लागल्या आहेत. त्यावरून काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंग सुरजेवाला (randeepsingh surajewala criticized central government) यांनी केंद्र सरकावर जोरदार निशाणा साधला आहे. 

    नवी दिल्ली: देशात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. रोज हजारो लोक कोरोनाने मृत्यूमुखी पडत आहेत. त्यामुळे स्मशनाभूमीतही मृतदेह जाळण्यासाठी रांगाच रांगा लागल्या आहेत. त्यावरून काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंग सुरजेवाला (randeepsingh surajewala criticized central government) यांनी केंद्र सरकावर जोरदार निशाणा साधला आहे.

    रणदीपसिंग सुरजेवाला यांनी ट्विट करून केंद्र सरकारवर टीका केली आहे. हे मानवतेच्या विरोधात आहे. हा गुन्हा आहे. अंत्यसंस्कारासाठी लागलेल्या या रांगा अहंकारी शासक दगडाच्या काळजाचे असल्याचा हा पुरावा आहे, असं ट्विट सुरजेवाला यांनी केलं आहे. आपल्याच जनतेचे मृत्यू होत आहेत. अशा घटनांमुळे कोणतेही सरकार मजबूत होऊ शकत नाही. या घटना आणि फोटो मोदी सरकारचा आयुष्यभर पिच्छा पुरवतील, अशी टीका ही त्यांनी केली आहे.

    काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही ट्विट करून लोकांनी एकमेकांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे. या आंधळ्या सिस्टिमला सत्य दाखवलं पाहिजे, असं त्यांनी म्हटलं आहे. एकमेकांना मदत करताना सामान्य लोक दिसत आहेत. यातून कोणाचं मन जिंकण्यासाठी हाताला स्पर्श करण्याची गरज नसल्याचं दिसून येतं. मदतीचा हात असाच देत राहा आणि या आंधळ्या सिस्टिमला सत्य दाखवत राहा, असं आवाहन राहुल गांधी यांनी केलं आहे.

    दरम्यान, गेल्या चोवीस तासात भारतात ३ हजार २९३ लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. कोरोनाने एकाच दिवशी ३ हजार रुग्णांचा मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ आहे. तसेच गेल्या २४ तासात देशात कोरोनाचे ३,६०,९६० नवे रुग्ण सापडले आहेत.