ट्रॅक्टर रॅलीत शेतकरी नेत्यांच्या हत्येचा कट? शेतकऱ्यांनी माध्यमांसमोर सादर केलेल्या व्यक्तीचा मोठा खुलासा…

२६ जानेवारी म्हणजेच, प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ट्रॅक्टर परेड (Tractor Rally) काढणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र, याचवेळी शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली उधळून लावण्यासाठी शेतकरी नेत्यांना गोळ्या (Shoot) घालण्यात येणार होत्या, याबाबतचा खळबळजनक खुलासा समोर आला असून शुक्रवारी रात्री घुसलेल्या एका शुटरला पकडण्यात आले आहे.

नवी दिल्ली: नव्या कृषी कायद्यांविरोधात (Agriculture Laws) दिल्लीच्या सिंघू सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन (Farmers Agitation) सुरू आहे. तसेच आज या आंदोलनाचा ५९ वा दिवस आहे. तरीही कृषी कायद्यावर तोडगा निघालेला नाहीये. त्यामुळे २६ जानेवारी म्हणजेच, प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ट्रॅक्टर परेड (Tractor Rally) काढणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र, याचवेळी शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली उधळून लावण्यासाठी शेतकरी नेत्यांना गोळ्या (Shoot) घालण्यात येणार होत्या, याबाबतचा खळबळजनक खुलासा समोर आला असून शुक्रवारी रात्री घुसलेल्या एका शुटरला पकडण्यात आले आहे.

या कथित शुटरला चेहरा झाकून प्रसारमाध्यमांसमोर आणण्यात आले. सिंधू बॉर्डरवर शेतकऱ्यांनी या शुटरला पकडले आहे. हा शुटर शेतकरी नेत्यांना मारण्यासाठी आला होता. त्याने मीडियासमोरच दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. या शूटरने सांगितले की, २६ तारखेला शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये गोळ्या झाडून वातावरण खराब करायचे होते. याचबरोबर २३ ते २६ जानेवारीदरम्यान शेतकरी नेत्यांवर गोळ्या झाडायच्या होत्या. तसेच त्याच्यासोबत आणखी काही जण असून यामध्ये महिलाही आहेत. या महिलांचे काम आंदोलकांना भडकविण्याचे होते. या शुटरने जाट आंदोलनातही गोंधळ घालण्याचे काम केल्याचे कबूल केले आहे.

शूटरने पुढे सांगितले की, २६ तारखेला चार लोक स्टेजवर असणार होते. त्यांना गोळ्या झाडण्याचे आदेश होते. यासाठी या चार लोकांचे फोटो मला देण्य़ात आले होते. हे सारे ज्या व्यक्तीने सांगितले तो राई पोलीस ठाण्याचा एसएचओ प्रदीप आहे. तो नेहमी त्याचा चेहरा झाकून ठेवायचा आणि बोलायचा, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या शुटरला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.