…म्हणून गुजरातमधील मंदिराचा वादग्रस्त निर्णय; लहान कपडे घालून येणाऱ्यांना प्रवेशबंदी

मंदिर ट्रस्टकडून सांगण्यात आले आहे की, असे कपडे घालून येणाऱ्या भाविकांना मंदिराच्या बाहेरच थांबविण्यात येणार आहे. दरम्यान, ट्रस्टकडून दर्शनासाठी कपड्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

    नवराष्ट्र न्यूज नेटवर्क, अहमदाबाद.

    उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी महिलांच्या पेहरावावरून दिलेल्या वक्तव्यावर गोंधळ सुरू असतानाचा गुजरातच्या प्रसिद्ध शामलाजी विष्णू मंदिर ट्रस्टनेदेखील एक वादग्रस्त निर्णय घेतला आहे. ट्रस्टने लहान कपडे घालून येणाऱ्या भाविकांना मंदिरात प्रवेशबंदी केली आहे.

    मंदिर ट्रस्टकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा नियम लागू करण्यात आला आहे. मंदिर ट्रस्टकडून सांगण्यात आले आहे की, असे कपडे घालून येणाऱ्या भाविकांना मंदिराच्या बाहेरच थांबविण्यात येणार आहे. दरम्यान, ट्रस्टकडून दर्शनासाठी कपड्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. या अंतर्गत मंदिराच्या बाहेरच पुरुषांसाठी धोतर किंवा पितांबर व महिलांसाठी लेहंग्याची सोय करण्यात येईल. हे कपडे घालून ते मंदिरात प्रवेश करू शकतील.

    मंदिर विश्वस्तांनी लावला बोर्ड

    विश्वस्तांनी मंदिराच्या बाहेर फलक लावला आहे. ज्यात दर्शनासाठी येणाऱ्या भावाबहिणींना विनंती आहे की, लहान कपडे व बरमुडा घालून येणाऱ्यांना प्रवेश मिळणार नाही. त्यासाठी पारंपरिक पोशाख घालून या. मास्क लावणे अनिवार्य असल्याचे लिहिण्यात आले आहे. श्रीकृष्णाच्या श्यामल स्वरूपाच्या नावावर प्रसिद्ध हे मंदिर शामलाजी गुजरातच्या अरवल्ली जिल्ह्यात आहे, जे शामलाजी विष्णू मंदिर म्हणून ओळखले जाते. हे सुमारे 2000 वर्षे पुरातन मंदिर आहे. हे पवित्र मंदिर मेशवो नदीच्या किनारी आहे.